‘इकोफ्रेंडली बाप्पा’साठी आगाऊ मागणी...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

शाडू-कागद लगद्याच्या मूर्ती - पर्यावरण रक्षणासाठी वाढतोय पुढाकार; मूर्ती करण्यासाठी स्वतंत्र विभाग

कोल्हापूर - यंदाच्या गणेशोत्सवासाठी आता मूर्ती तयार करण्याची धांदल सुरू झाली असून, ‘इकोफ्रेंडली बाप्पा’साठी आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना यंदाही मागणी वाढली असून सार्वजनिक मंडळांनीही अशा मूर्तींसाठी पुढाकार घेतला आहे. 

शाडू-कागद लगद्याच्या मूर्ती - पर्यावरण रक्षणासाठी वाढतोय पुढाकार; मूर्ती करण्यासाठी स्वतंत्र विभाग

कोल्हापूर - यंदाच्या गणेशोत्सवासाठी आता मूर्ती तयार करण्याची धांदल सुरू झाली असून, ‘इकोफ्रेंडली बाप्पा’साठी आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना यंदाही मागणी वाढली असून सार्वजनिक मंडळांनीही अशा मूर्तींसाठी पुढाकार घेतला आहे. 

येथील चेतना विकास मंदिर संस्थेकडे कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना मागणी वाढत असल्याने चेतना शाळेत आता इकोफ्रेंडली मूर्ती तयार करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. चेतना शाळा हे प्रातिनिधिक उदाहरण असले तरी इकोफ्रेंडली मूर्तीची परंपरा जपलेल्या अनेक कारागीर व संस्थांकडेही अशीच परिस्थिती यंदा आहे. 

नऊ इंचांपासून ते पाच फुटांपर्यंतच्या मूर्ती येथे उपलब्ध आहेत. नऊ इंची मूर्तीसाठी अर्धा ते पाऊण किलो, अडीच फूट मूर्तीसाठी पंधरा किलो, तर पाच फूट मूर्तीसाठी पंचेचाळीस किलो कागदाचा लगदा लागतो. कागदी लगद्याची मूर्ती असली, तरी ती मजबूत असते. ती विसर्जित केली, तरीही पाणी प्रदूषित होत नाही. तसेच पाण्याने भरलेल्या बादलीत विसर्जन केले, की ते पाणी खत म्हणून वापरता येते. उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाशी नाते जोडण्याचे काम येथील काही संस्थांनी हाती घेतले आहे. तीन वर्षांपासून सार्वजनिक मंडळांसाठी कागदाच्या पाच फुटांच्या मूर्तीही विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. २०१५ मध्ये सहा मंडळांनी मूर्ती नेल्या. गेल्या वर्षी मंडळांची संख्या दहा होती. यंदा सात मंडळांनी नोंदणी केली आहे.

शाडूच्या मूर्ती
कोल्हापूर शहरात २०१३ मध्ये मागणीनुसार ५००० शाडू मूर्ती तयार होत्या. निसर्गमित्र संस्थेकडे प्रत्येकवर्षी गणेशोत्सवापूर्वी लोकांना मूर्ती नोंदणीसाठी आवाहन करते. २०१३ मध्ये एकट्या निसर्गमित्र संस्थेकडून दीड हजार मूर्ती भाविकांनी नेल्या. २०१४ मध्ये ही संख्या सतराशेवर तर २०१५ मध्ये एकवीसशेवर आली. गेल्या वर्षी एकट्या ‘निसर्गमित्र’ संस्थेकडून अडीच हजारांवर शाडूच्या मूर्ती गेल्या. यंदा किमान बारा हजारांवर शाडूच्या मूर्ती एकट्या शहरात तयार होणार आहेत.  

यशस्वी कोल्हापूर मॉडेल 
कोल्हापूरकरांनी गेल्या वर्षी जिल्ह्यात तब्बल तीन लाख ५७ हजार मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. त्याशिवाय दीड हजारांवर ट्रॅक्‍टर निर्माल्य संकलित झाले. २०१५ च्या तुलनेत ही वाढ दुप्पट असून लोकांनीच ही चळवळ हाती घेत राज्यात पर्यावरणाचे कोल्हापूर मॉडेल यशस्वी करून नवा आदर्श घालून दिला आहे. ३७५ सार्वजनिक तरुण मंडळांनी मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. 

बारा मूर्ती एक्‍स्चेंज 
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर मूर्तीचे प्रतीकात्मक विसर्जन करून तीच मूर्ती पुढील वर्षीच्या गणेशोत्सवासाठी दुसऱ्या मंडळांना देण्याचा आदर्श पायंडा गेल्या चार वर्षांपासून शहरात पडला आहे. सुरवातीला दोन-तीन मंडळांनीच ही संकल्पना उचलून धरली होती. गेल्या वर्षी एकूण बारा मंडळांनी मूर्ती एक्‍स्चेंज केली. 

इकोफ्रेंडली सजावट
गेल्या दोन वर्षांत डिजिटल फलकांना फाटा देऊन इकोफ्रेंडली सजावटीला मंडळांनी प्राधान्य दिले आहे. विविध थीम व मूर्तीच्या रूपाला अनुसरून हॅंडमेड सजावटीचा नवा ट्रेंड सुरू झाला असून, दोनशेहून अधिक कलाशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून आर्थिक आधार मिळतो आहे. इको फ्रेंडली सजावटीला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता ही बाजारपेठ भविष्यात वृदिगंत होऊ शकते. मंडळांचाही अशा सजावटीकडे कल वाढल्याचे दिसून येते.

Web Title: kolhapur news eco friendly ganapati demand