कर्मचाऱ्यांमुळे धो धो पावसातच महावितरणची वीज पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - शहरभर झालेल्या धुवाँधार पावसामुळे सर्वत्र दैना उडाली असताना कडाडाणाऱ्या विजा आणि पावसाच्या जोरदार सरींमुळे महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाल्याने अर्ध्याहून अधिक शहरात अंधार झाला. मात्र मध्यरात्रीच हा प्रकार घडल्याने भर पावसातही महावितरणच्या ४० हून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांनी रात्रीतच वीज जोडण्यांची दुरुस्ती करीत सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला.

बापट कॅम्प येथील घरगुती व रस्त्यावरील वीज दिव्यांना वीज पुरवठा करणारा फिडर बंद पडला. त्यामुळे रात्री साडेबाराच्या सुमारास बापट कॅम्प, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, कावळा नाका, रुईकर कॉलनी ते विक्रमनगर अशा परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. तेथे महावितरणचे पथक तातडीने दुरुस्तीसाठी सक्रिय झाले. पावसात एका फिडरवरील वीज पुरवठा दुसऱ्या फिडरवरून सुरू केल्यामुळे अवघ्या तीन तासात येथील वीज पुरवठा सुरळीत झाला. 

असाच प्रकार पुईखडी येथेही झाला. त्यामुळे बालिंगा, रंकाळा, फुलेवाडी परिसरात अंधार होता. पहाटे पाच वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला. 
सुभाषनगर, शेंडा पार्कसह काही भागात वीजपुरवठा बंद झाला. तेथेही सकाळी पर्यायी फिडरवरून वीज पुरवठा देत वीज पुरवठा सुरळीत केला गेला. सकाळी आठ वाजताच बंद फिडर दुरुस्त करून वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आला; तर नागाळा पार्कात झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. तोही सकाळी पूर्ववत करण्यात आला. शहरभरात जवळपास अन्य सात ठिकाणी वीज पुरवठा बंद होता.

Web Title: kolhapur news electricity start in heavy rain