हत्तीने तुडवले; गव्याने केले फस्त 

रणजित कालेकर
सोमवार, 25 जून 2018

आजरा - पावसाने समाधानकारक सुरवात केल्याने तालुक्‍यात शेतकऱ्यांत चैतन्याचे वातावरण आहे. भात, ऊस तरारले आहे. हे चित्र एकीकडे समाधानकारक असले तरी दुसरीकडे वन्यप्राण्यांचे संकट कायम आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम व दक्षिण भागात गव्याकडून भाताचे तरवे फस्त होत आहेत. तर हत्तीकडून तुडवले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर भात रोपलावणीची चिंता लागली आहे. 

गेले पंधरा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा तालुक्‍यात दमदार सुरवात केली आहे. आज दिवसभर तालुक्‍यात पाऊस कोसळत होता. पण तरारलेल्या पिकांमध्ये गव्याचे कळप उतरू लागले आहेत. भाताचे तरवे हे कळप फस्त करीत आहेत. यात जंगला लगत असलेल्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पेरणोली व गवसे परिसरात गव्यांच्या कळपांनी धुमाकूळ घातला आहे. भाताचे रोपलावणीसाठी तरारलेले तरवे गवे खात आहेत. पेरणोली पैकी नावलकर वाडी येथील सदाशिव नावलकर यांचा एक एकराचा भाताचा तरवा गव्यांच्या कळपाने फस्त केला. वेळवट्टी परिसरात टस्कर हत्ती भाताच्या तरव्याचे तुडवत गेल्याचे शेतकरी सांगतात. येथील पृथ्वीराज महागावकर यांच्या शेतातील भाताचा तरव्याचे हत्तीने तुडवून नुकसान केले. त्यामुळे भात रोपलावणीच्या वेळी शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. वनविभागाने हत्ती व गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 
 
एक एकर शेतासाठी भाताचा तरवा केला होता. महागाचे भात बियाणे पेरले होते. ते चांगले तरारले होते. गव्याच्या कळपाने तरव्याचे नुकसान केले आहे. रोपलावण करावयाची कशी ?

- सदाशिव नावलकर, शेतकरी 

Web Title: Kolhapur News elephant and Gava damage field crop