‘ते’ हत्ती पुन्हा रमणार कळपात

‘ते’ हत्ती पुन्हा रमणार कळपात

कोल्हापूर - तिलारी जंगल परिसरात असलेल्या हत्तींच्या कळपातील दोन हत्ती वाट चुकून नव्हे, तर जंगलाचा अंदाज घेत गगनबावड्यापर्यंत आले. एक परतला, दुसरा याच परिसरात भरकटत राहिला. तो पुढे पन्हाळा तालुक्‍याच्या तोंडावर येऊन घुटमळला. वातावरणातील बदल व विरळ जंगलाचा अंदाज घेत पुन्हा तो परतू लागला. काही दिवस राधानगरी, दाजीपूर अभयारण्याजवळ वावरत राहिला. गेल्या आठवड्यात त्याने राधानगरीतून आजरा गाठले. दोनच दिवसांत आजरा जंगल सोडून तो चंदगडात दाखल झाला. या घडामोडींच्या नोंदी घेत, हत्ती पुन्हा कळपात रमणार, असा निष्कर्ष वन विभागाने काढला आहे.

आजरा ते पन्हाळा परिसरातील विविध जंगली वाटांवर हत्तीचे दर्शन घडले. कधी तो अगदी मानवी वस्तीजवळ आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियातून फिरले आणि गोवा, कोकणकडे निघालेल्या पर्यटकांच्या गाड्या हत्ती आलेल्या गावांकडे वळू लागल्या. या पार्श्‍वभूमीवर वन विभागाच्या वनरक्षक व वनपालांनी हत्तीचा माग घेत काही अंदाज बांधले. 

अंदाज असे - शंभर वर्षांपूर्वी पश्‍चिम घाटात विपुल जंगल होते. कर्नाटकातील हत्तींबरोबर पश्‍चिम घाटात हत्तींचा वावर होता. या घाटात हत्तींना वावरण्याची सवय आनुवांशिकतेने त्यांच्या पुढील पिढ्यांत आली. रस्ते होऊन वाहनांची वर्दळ वाढली. हत्तींच्या वावराला काही अंशी मर्यादा आल्या. या काळात हत्ती दिसला नाही. एक-दोन हत्ती घनदाट जंगलातून येत-जात राहिले. त्यांची चाहूल मात्र नव्हती; मात्र कर्नाटक जंगल भागातून हत्तींचा एक कळप बारा वर्षांपूर्वी पश्‍चिम घाटात आला. हत्तींना हुसकावण्यासाठी मोहीम आखली. त्याला अपयश आले. नंतर हत्ती परतले. 

तिलारी जंगल, दोडामार्ग परिसरात त्यांचा कळप वावरत राहिला. त्यांतील दोन हत्ती वाट चुकत गतवर्षी राधानगरीपर्यंत आले. तिथून माघारी परतले. यंदाही सुरवातीला दोन हत्ती राधानगरीपर्यंत आले. तिथून एक परतला, दुसरा पुढे गगनबावडा व पन्हाळ्यात गेला. 

राधानगरी, गगनबावडा, पन्हाळ्यात दोन अडीच महिने वावरला. पावसाळा संपला, थंडी पडू लागली, हत्तीच्या विणीचा हंगाम सुरू झाला, की नैसर्गिकरीत्या त्याची चाहूल लागते. कळपातील मादीच्या दिशेने त्याची पावले पडू लागली, म्हणजेच तो परतू लागला. सध्या हत्ती दोन दिवसांपूर्वी चंदगडच्या देवर्डेकडील बाजूने गेला. आजरा ते चंदगड अंतर त्याने दोन दिवसांत पार केले. देवर्डेपासून पुढे तिलारीच्या जंगलाकडे हत्तींचा मूळ कळप आहे. तिथे हत्ती जाऊ शकेल. एवढी खात्री वनरक्षकांना आहे. वनविभाग सतर्क राहून हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे. हत्तीच्या विणीचा हंगाम जवळपास डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचा आहे. या काळात हा कळप जिथे आहे, त्याच परिसरात वावरत राहील. त्यानंतर कळप किंवा एक-दोन हत्ती पुन्हा गगनबावड्यापासून पुढे पार चांदोलीपर्यंत जाऊ शकतात. 

हत्ती ज्या मार्गे आला, त्याच मार्गे परतू लागला. विणीचा हंगाम असल्याने त्याच्या हालचाली वेगवान असू शकतात. हत्तीला बघण्याच्या उत्सुकतेपोटी जवळ जाणे, त्यांच्या मार्गावर अडथळा, गोंगाट करणे धोकादायक ठरू शकते. हत्तीची दिशा व वाटचाल पाहता तो मूळ कळपाच्या शोधातच निघाल्याचे दिसते. त्याला कोणताही अडथळा होऊ नये, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे.
-दत्ता पाटील,
वनपाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com