टस्कराचा मुक्काम मानवाड जंगलात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

बाजारभोगाव - पश्‍चिम पन्हाळ्याच्या पडसाळी परिसरात धुडगूस घातलेल्या टस्करने शनिवारी रात्री सावर्डी (ता. शाहूवाडी)मार्गे २५ ते ३० किलोमीटरचे अंतर कापून परत मानवाड (ता. पन्हाळा) जंगलात मुक्काम प्रस्थापित केला. कोलिक, पडसाळीतील ग्रामस्थांनी निःश्‍वास टाकला असून, पोंबरे, पिसात्री, मानवाड परिसर भयभीत झाला आहे. टस्करने मानवाड धनगरवाड्यावर उसाचे अतोनात नुकसान केले आहे. वन विभागाने ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. 

जांभळी खोऱ्यातील कोलिक- पडसाळी परिसरात गगनबावडा तालुक्‍यातून पंधरा दिवसांपूर्वी टस्कर आला होता. तो शनिवारी सकाळी पडसाळी, वाशी वनहद्दीतून सावर्डी (ता. शाहूवाडी) वनहद्दीत घुसला. त्याच सायंकाळी पन्हाळ्यात परत येत  पाटपन्हाळ्याच्या डोंगरमाथ्यावरील कापलिंग मंदिराशेजारून दक्षिणेकडील मानवाडपैकी खापणेवाडी - सपकाळवाडीच्या शिवारात दाखल झाला. आज पहाटे सहाच्या सुमारास मानवाड ‘ढवण’ धनगरवाड्यावर दाखल झाला. तेथील विठ्ठल भागोजी ढवण यांच्या घरामागील शेतात उसाचा फडशा पाडताना तेथील महिलांना आढळला.

महिलांना हत्ती दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावकरी शेताभोवती जमले. आरडाओरड, गोंधळामुळे हत्तीने बिथरून बाजारभोगाव - पडसाळी रस्त्यापलीकडील मानवाडच्या जंगलाकडे जाणे पसंत केले; मात्र जंगलाकडे जाताना हत्तीने विठ्ठल भागोजी ढवण, रामदास ढवण, लक्ष्मण ढवण यांच्या उसाचे मोठे नुकसान केले. प्रकाश दाभोळकर यांनी वन विभागाच्या पिसात्री कार्यालयाला याबाबतची वर्दी दिली. टस्करने कोलिक- पडसाळी ते मानवाड व्हाया सावर्डी असा एका रात्रीत सुमारे २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास केला. या प्रवासात त्याने मार्गातील ऊस, नाचणी, भात पिकांचे मोठे नुकसान केले.

दरम्यान, हत्तीपासून धोका असल्याने स्थानिकांनी जंगलात अथवा जंगलालगतच्या शेतात जाऊ नये, असे आवाहन वनपाल आर. बी. जाधव यांनी केले. वनरक्षक आशिष चाळसकर, मनीषा देसाई, सुनील कांबळे, के. बी. बादरे, ए. जी. मोरे, वनमजूर नाथा कांबळे, शामराव जाधव, शंकर पवार, आकाराम पाटील, हिंदुराव पाटील, आकाराम खोत आदी हत्ती लोकवस्तीत येऊ नये, यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Kolhapur News Elephant in Manavad Forest

टॅग्स