जलाशय पार करून हत्ती डिगसमध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

कोल्हापूर - राधानगरी धरणाचा जलाशय पार करत हत्तीने काल सायंकाळी दाजीपूर अभयारण्यालगतच्या डिगस गावात प्रवेश केला. हा परिसर दाजीपूरजवळ असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले.

कोल्हापूर - राधानगरी धरणाचा जलाशय पार करत हत्तीने काल सायंकाळी दाजीपूर अभयारण्यालगतच्या डिगस गावात प्रवेश केला. हा परिसर दाजीपूरजवळ असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले.

हा हत्ती (टस्कर) एकटा आहे. समोर अचानक आलेल्या पर्यटकांना बिथरून हत्तीकडून कोणावरही हल्ला होऊ नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात आली. 

हत्तीचा राधानगरी परिसरात काही दिवस वावर आहे. दोन दिवसांपूर्वी तो भैरी बांबर परिसरात होता. काल सायंकाळी मांडरेवाडीजवळ काहीजण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारीसाठी गेले असता त्यांना धरणाच्या पाण्यात हत्ती व तो डिगसच्या दिशेने जात असल्याने दिसले. त्यामुळे लोक मासेमारी सोडून गावाकडे पळत सुटले व त्यांनी गावात हत्ती येत असल्याची कल्पना दिली. रात्री आठच्या सुमारास डिगस गावात जेथे सात महिन्यांपूर्वी हत्ती आला होता. त्याच ठिकाणी तो येऊन थांबला. याच मार्गाने तो पुढे मानबेट व तेथून पुढे गगनबावडा येथे जाईल, असा वन विभागाचा अंदाज आहे. कारण सात महिन्यांपूर्वी तो याच मार्गाने गगनबावड्यापर्यंत गेला होता. 

दाजीपूरपासून सहा-सात किलोमीटरवर डिगस गाव आहे. काल हत्ती आल्यानंतर आम्ही सर्व गावकऱ्यांना सावध केले आहे. दिवस मावळला, की किंवा पहाटे कोणी घराबाहेर पडू नये, अशा सूचनाही दिल्या आहेत. 
- रूपेश पाटील
(ग्रामस्थ, डिगस)

Web Title: Kolhapur News Elephant seen in Digas