ब्रह्मपुरी टेकडी गेली कुठे ?

सुधाकर काशीद
गुरुवार, 31 मे 2018

कोल्हापूर - पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाच्या निमित्ताने पुरातत्त्व खात्याचे अधिकारी काल त्या परिसरात आले आणि संपूर्ण पुरातन ब्रह्मपुरी टेकडीलाच अतिक्रमणाने कसे घेरले आहे, हे त्यांच्या नजरेस आले.

कोल्हापूर - पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाच्या निमित्ताने पुरातत्त्व खात्याचे अधिकारी काल त्या परिसरात आले आणि संपूर्ण पुरातन ब्रह्मपुरी टेकडीलाच अतिक्रमणाने कसे घेरले आहे, हे त्यांच्या नजरेस आले.

ज्या ब्रह्मपुरी टेकडीवर मूळ कोल्हापूर वसले होते, ज्या टेकडीवर केलेल्या उत्खननात दोन हजार वर्षांपूर्वीचा कोल्हापूरचा इतिहास उजेडात आला, ती टेकडी आता कोठे आहे? हे शोधायची वेळ पुरातत्त्व अधिकाऱ्यांवर आली. अर्थात जेथे आवश्‍यक आहे, तेथे पुरातन वास्तूचे जतन कसे होत नाही आणि नको तेथे पुरातत्त्वचा बाऊ कसा केला जातो, याचीच झलक पुरातत्त्व, सार्वजनिक बांधकाम, महापालिका, हेरिटेज या विभागांतल्या तज्ज्ञांनाच काल पाहता आली. 

एक नजर ब्रह्मपुरीवर...

  •  ब्रह्मपुरी टेकडीवर मूळ कोल्हापूर होते 
  •  पंचगंगा नदीवरून येताना जो उंचवटा आहे ती ब्रह्मपुरी टेकडी 
  •  टेकडीवर १९४४ ते १९४७ या कालावधीत उत्खनन झाले 
  •   उत्खननात जुन्या कोल्हापूरचे अवशेष मिळाले 
  •  उत्खननात सापडलेली भांडी, दागिने, खेळणी, काचेचे मणी, ब्राँझच्या मूर्ती, विटा, कौले या वस्तू टाऊन हॉल वस्तुसंग्रहालयात आहेत

पंचगंगेवरील पर्यायी शिवाजी पुलाची किती जागा पुरातत्त्व विभागाच्या हद्दीत येते, याची पाहणी करण्यासाठी काल अधिकारी आले होते. पुलाच्या जागेपासून काही अंतरावर ब्रह्मपुरी टेकडी आहे. याच टेकडीमुळे या परिसराचा संबंध पुरातत्त्व विभागाशी आला आहे. ही टेकडी म्हणजे मूळ कोल्हापूर. शेजारी नदीचा काठ, काठावर टेकडी व टेकडीवर लोकांची वस्ती. या गाव स्थापत्य रचनेनुसार त्या काळात कोल्हापूर वसलेले. काही जणांच्या मते भूकंप, काहींच्या मते प्रलय; पण काहीतरी आपत्ती आली व हे छोटे गाव गाडले गेले. पुढे सहाव्या-सातव्या शतकात अंबाबाई मंदिराचे क्षेत्र रहिवासी क्षेत्राच्या दृष्टीने वसले गेले. 

टेकडीखाली मूळ कोल्हापूर...
१९४७ च्या सुमारास राजाराम कॉलेजचे प्रा. के. जी. कुंदनागर, आर. एस. पंचमुखी यांच्या पुढाकाराने व पुण्याच्या डेक्‍कन कॉलेजचे प्रा. हसमुख सांकलिया व डॉ. मोरेश्‍वर दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली या टेकडीवर उत्खनन केले. भांडी, नाणी, प्राचीन मूर्ती, काचेचे मणी आदी सापडले. एक रोमन देवतेचा पुतळाही उत्खननात सापडला. पुरातत्त्व खात्याने हा परिसर विशेष संरक्षित परिसर म्हणून घोषित केला. या टेकडीखाली कधी काळी मूळ कोल्हापूर होते, हेच विसरले गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News encroachment on Bramhapuri hill