चला, मातीचा वारसा जपू या...!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

कोल्हापूर - पर्यावरणदिनी शहरातील एखाद्या पर्यावरणीय प्रश्‍नाला भिडताना ‘सकाळ’चा पुढाकार आणि लोकसहभागातून थेट कृती कार्यक्रम हे आता समीकरणच बनले आहे. यंदाच्या पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता. ४) यंदा ‘चला, जपू या मातीचा वारसा’ ही मोहीम होणार असून शहरातील चोवीसहून अधिक प्रेरणास्थळांची स्वच्छता केली जाणार आहे. या निमित्ताने सारे कोल्हापूरकर एकवटणार आहेत. सकाळ आणि कोल्हापूर महापालिकेच्या पुढाकाराने ही मोहीम होईल. 

कोल्हापूर - पर्यावरणदिनी शहरातील एखाद्या पर्यावरणीय प्रश्‍नाला भिडताना ‘सकाळ’चा पुढाकार आणि लोकसहभागातून थेट कृती कार्यक्रम हे आता समीकरणच बनले आहे. यंदाच्या पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता. ४) यंदा ‘चला, जपू या मातीचा वारसा’ ही मोहीम होणार असून शहरातील चोवीसहून अधिक प्रेरणास्थळांची स्वच्छता केली जाणार आहे. या निमित्ताने सारे कोल्हापूरकर एकवटणार आहेत. सकाळ आणि कोल्हापूर महापालिकेच्या पुढाकाराने ही मोहीम होईल. 

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गेल्या नऊ वर्षांत ‘सकाळ’ने ‘चला, रंकाळा वाचवू या’, ‘चला, झाडे लावू या’, ‘चला, पंचगंगा वाचवू या’ अशा विविध मोहिमा हाती घेतल्या आणि त्या यशस्वीतेच्या एका विशिष्ट टप्प्यावर असताना आता ‘चला, जपू या मातीचा वारसा’ या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. बदलत्या काळातही कोल्हापूरने आपले मूळचे रांगडेपण, इथली संस्कृती आणि इथला अस्सल कोल्हापुरी बाज तितक्‍याच जिव्हाळ्याने जपला आहे आणि या साऱ्याच्या पाठीमागे येथील ऐतिहासिक वारसा आणि त्याची सळसळती प्रेरणा आहे. 

साडेतीन शक्‍तिपीठापैकी एक श्री महालक्ष्मी मंदिर, भवानी मंडप, रंकाळ्याचं खळाळणारं पाणी, जिल्ह्याची जीवनदायिनी पंचगंगा असो किंवा राजर्षी शाहू जन्मस्थळ, शतकोत्तर हीरकमहोत्सवी करवीर नगर वाचन मंदिर, फुटबॉलचा रांगडा बाज जपणारी राजर्षी शाहू, शिवाजी स्टेडियम असो किंवा विठ्ठल मंदिर, बाबूजमाल दर्गा, कोटीतीर्थ, जैनमठ... अशी विविध ऐतिहासिक ठिकाणं, स्मारकं ही या शहराची खऱ्या अर्थाने प्रेरणास्थानं. याच प्रेरणास्थळांच्या साक्षीनं आजही या शहराची वाटचाल सुरू आहे. मात्र त्यांच्याशी असलेलं आपलं नातं आणखी घट्ट करताना आता त्यांना जपण्याची, आवश्‍यक तेथे संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन ठेपली आहे. म्हणूनच यंदाचा पर्यावरण दिन साजरा करताना सकाळ माध्यम समूह आणि कोल्हापूर महापालिकेच्या पुढाकाराने विविध संस्था, संघटना आणि एकूणच कोल्हापूरकरांच्या सहभागाने ही मोहीम हाती होणार आहे. चला, आपापल्या परीने स्वतःचे कर्तव्य बजावू या... आपल्या मातीचा वारसा जपू या...! 

सहभागी होण्यासाठी...
या सामाजिक मोहिमेत तुम्हीही सहभागी होऊ शकता. तुम्हाला जवळ असलेल्या परिसरात तुम्ही जाऊन स्वच्छता करू शकता. तुम्ही तुमचा सहभाग ‘सकाळ’कडे नोंदवा. त्यासाठी ९१४६१९०११९ या व्हॉटस्‌ ॲप क्रमांकावर किंवा ९८८१०९९१३१ या क्रमांकावर संपर्क साधून तुमचा सहभाग नोंदवा.

काय करायचे
हेरिटेज वास्तूच्या ठिकाणची स्वच्छता
वास्तूंवरील झाडे-झुडपे काढणे
चिकटवलेले पोस्टर किंवा स्टीकर काढणे
चुकीच्या पद्धतीने वास्तूवर लिहिलेली अक्षरे पुसणे
(स्वच्छता मोहिमेची वेळ - सकाळी सात ते नऊ. स्वच्छतेनंतर साडेनऊपर्यंत भवानी मंडपात एकत्रित जमणे. तेथे सांगता समारंभ)

Web Title: kolhapur news environment