एका न दमलेल्या बापाची कहाणी....

सुधाकर काशीद
सोमवार, 18 जून 2018

कोल्हापूर - सर्वत्र आज ‘फादर्स डे . वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या निमित्ताने रवी सोळंकी यांनी बाप म्हणून अनुभवलेले अनुभव... 

कोल्हापूर - सर्वत्र आज ‘फादर्स डे . वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या निमित्ताने रवी सोळंकी यांनी बाप म्हणून अनुभवलेले अनुभव... 

‘‘मी दोन मुलांचा बाप; पण १३ वर्षे मी घरात बाप आणि आई या दोन्ही भूमिकेत आहे. पहिल्यांदा थोडं जड गेलं. पण घरात बाप आणि आई असं बनून काढलेल्या प्रत्येक दिवसाचा अनुभव माझ्या वाट्याला आहे...’’ रवी सोळंकी त्यांचे अनुभव सांगत होते. त्यांच्या मते ‘फादर्स डे’ एक इव्हेंट करणे सोपे असते; पण कठीण परिस्थितीत बाप म्हणून जबाबदारी पेलणे हे काय असते हे बापालाच माहीत.

रवी सोळंकी, त्यांची पत्नी गीता, मुले अनिल व सतेज व सोबत ८४ वर्षांचे वडील असे छोटे मध्यमवर्गीय कुटुंब. २००५ साली पत्नी गीता यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि चालत्या-बोलत्या त्या मांसाचा गोळा बनल्या. हात राहू दे, हाताचे बोटही त्यांना हलवता येईना. मुले दहा-पंधरा वर्षांची. रवी सोळंकी हडबडून गेले. पत्नीची रोज सेवा, आंघोळ, वेणीफणी, त्यानंतर चहा-पाणी, जेवण करू लागले. अंथरुणावरून पत्नी गीता डोळ्यानेच असं करा, तसं करा खुणवायची. मग रवी पीठ मळायचे. चपाती लाटायचे, भाजायचे. त्याच पद्धतीने भात, भाजी करायचे. पत्नीला चारायचे. मुलांचा शाळेचा डबा भरून द्यायचे. मुलंही समजूतदार बापाची घालमेल पाहायचे. बापानं जे केलंय ते ‘पप्पा छान...’ म्हणत खायचे. पत्नीला बरे करण्यासाठी औषधोपचार सुरू होते. या आजारातून ती कधी बाहेर पडेल, असे रवी डॉक्‍टरांकडे काकुळतीने येऊन विचारायचे; पण डॉक्‍टर केवळ हसायचे आणि जमेल तेवढी पत्नीची सेवा करा, असे सांगायचे. 

औषधाच्या खर्चापोटी प्लॉट विकला
रवी सेवा करत राहिले. एखाद्या बाळाची सेवा करावी तशी आपल्या पत्नीची सेवा करू लागले. तिची छान वेणी घालू लागले. सणादिवशी तिच्या वेणीत गजरा बांधू लागले. रोज देव्हाऱ्यासमोरचे कुंकू घेऊन लावू लागले. मुलांना शाळेत पाठवू लागले. औषधाच्या खर्चाने ते कधी कधी संतापू लागले. पण अशा परिस्थितीत चीडचीड केली, तर पत्नी, मुलांना काय वाटेल म्हणून संताप गिळू लागले. औषधाच्या खर्चापोटी प्लॉट येईल त्या किमतीला विकला. पण त्यांनी या परिस्थितीत बाप म्हणून जो काही क्षण वाट्याला येईल, त्याला तोंड द्यायचा निर्धार केला. 

आजारपणातून पत्नी बाहेर
कसं कोण जाणे, रवी सोळंकी यांना पत्नीवर ॲक्‍युप्रेशर उपचार करण्याचा सल्ला कोणीतरी दिला. त्यांनी ते उपचार सुरू केले. रोज ते उपचार देणे खर्चिक असल्याने ते स्वत: उपचार कसे करायचे शिकले व पत्नीला ॲक्‍युप्रेशर उपचार करू लागले. सोबत इतर औषधे चालूच ठेवली. १३ वर्षांनी त्यांच्या या धडपडीला यश आले. पत्नी गीता स्वतःच्या पायावर उभी राहिली. घरातली छोटी छोटी कामे करू लागली आहे. आता तिने अंथरुण सोडले आहे आणि ‘माझा नवराच माझा देव, माझी आई आणि माझा बाप आहे...’ एवढंच ती डबडबलेल्या डोळ्यांनी प्रत्येकाला सांगत आहे.

Web Title: Kolhapur News Fathers Day Special