महोत्सवांचा, सांस्कृतिक पर्वणीचा फेब्रुवारी...!

महोत्सवांचा, सांस्कृतिक पर्वणीचा फेब्रुवारी...!

कोल्हापूर - यंदाचा फेब्रुवारी महिना कोल्हापूरकरांना सांस्कृतिक पर्वणीचा ठरणार आहे. जागतिक कला महोत्सवासह विविध कार्यशाळा आणि महोत्सवासह स्पर्धांची मेजवानी मिळणार असून देशभरातील लोककला जतन करणाऱ्या कलाकारांशी संवादाची संधीही मिळणार आहे. दरम्यान, फेब्रुवारीत पर्यटकांची मोठी गर्दीही येथे होणार आहे. त्यादृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन होईल. 

गुरुवारपासून संगीत नाट्य
राज्याच्या कला सांस्कृतिक संचालनालयातर्फे गुरुवार (ता. १) पासून राज्य संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात प्रारंभ होईल. राज्यभरातून २८ संघ या स्पर्धेत सहभागी असून दररोज सायंकाळी सात वाजता प्रयोगाला प्रारंभ होईल. 

जागतिक कला महोत्सव
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि गायन समाज देवल क्‍लबच्या संयोजनाखाली ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान शिवाजी स्टेडियमवर जागतिक कला महोत्सव रंगणार आहे. जागतिक कीर्तीच्या कलाकारांचा कलाविष्कार यानिमित्ताने कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे.

बोन्साय जतन कार्यशाळा
येथील गार्डन क्‍लब आणि बोन्साय क्‍लबतर्फे ३ व ४ फेब्रुवारीला बोन्साय जतन कार्यशाळा होणार आहे. जपानचे प्रसिद्ध बोन्साय मास्टर मेगुमी बेनेट यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा होणार असून बोन्सायचे विविध प्रकार शिकण्याची संधी यानिमित्ताने मिळेल. 

रविवारपासून प्रदर्शन
जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रविवार (ता. ४) पासून ‘ब्लेडस्‌ ऑफ ग्लोरी’ क्रिकेटच्या वस्तूंचे प्रदर्शन होणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बॅटबरोबर सेल्फी तसेच अकरा वर्ल्डकप सामन्यातील खेळाडूंच्या बॅट, टीशर्टस्‌, पॅडस्‌, हेल्मेटस्‌ आदी वस्तूंचा प्रदर्शनात समावेश असेल. शाहू स्मारक भवनातील कलादालनात हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.

समभाव चित्रपट महोत्सव
कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी, मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड ॲब्यूज्‌ (मावा), महिला दक्षता समिती व न्यू एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान समभाव चित्रपट महोत्सव रंगणार आहे.
या महोत्सवात एकूण १६ माहितीपट, लघुपट व चित्रपटांची पर्वणी आणि परिसंवाद, चर्चासत्र होईल.

चित्रपट महोत्सव
मराठी नाट्य, चित्रपट वेल्फेअर असोसिएशनतर्फे १० व ११ फेब्रुवारीला शाहू स्मारक भवनात मराठी चित्रपट महोत्सव रंगणार आहे. यानिमित्ताने चित्रपट प्रदर्शनासह विविध मुक्तसंवाद आणि सेलिब्रिटींची उपस्थिती वैशिष्ट्य ठरणार आहे. 

कारागीर महाकुंभ
कणेरी येथील सिद्धगिरी मठावर ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान कारागीर महाकुंभ सजणार आहे. देशभरात विविध कानाकोपऱ्यांत लोककला जपलेल्या कलाकारांना या महाकुंभासाठी निमंत्रित केले आहे. भारतीय संस्कृती उत्सवाला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या दरम्यान भारतीय खाद्य महोत्सव आणि देशी गोवंश प्रदर्शनही होणार आहे.

बालचित्रपट महोत्सव
चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे २१ व २२ फेब्रुवारीला शाहू स्मारक भवनात बालचित्रपट महोत्सव रंगणार आहे. महापालिका शाळांतील मुलांसाठी हा महोत्सव होणार आहे. बालचित्रपट प्रदर्शनाबरोबरच विविध चर्चासत्रे या दरम्यान होतील. 

फिनिक्‍स हास्यगौरव
फिनिक्‍स क्रिएशन्सतर्फे यंदाही फिनिक्‍स हास्यगौरव ही प्रहसन स्पर्धा रंगणार आहे. त्याची प्राथमिक फेरी २५ फेब्रुवारीला होणार आहे. राज्यभरातून या स्पर्धेत स्पर्धक सहभागी होतील. अंतिम फेरी ४ मार्चला संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात होईल. स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. 

किरणोत्सव अन्‌ जोतिबाचे खेटेही...!
श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या साक्षीनेच फेब्रुवारी उजाडेल. ३१ जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान किरणोत्सव होणार असला तरी मावळतीच्या सूर्यकिरणांची पाच दिवस नोंद केली जाणार आहे. त्याशिवाय चार फेब्रुवारीपासून जोतिबाच्या खेट्यांना प्रारंभ होईल. १३ फेब्रुवारीला महाशिवरात्री असून यानिमित्तानेही विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. त्याशिवाय १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुका आकर्षण असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com