फ्लॉवर फेस्टिव्हलमुळे ‘कोल्हापूर ब्रँड’ राज्यभर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

कोल्हापूर - राज्यातील पहिल्या फ्लॉवर फेस्टिव्हलने कोल्हापूरच्या पर्यटनात भर घातली. राज्यात कोल्हापूरचे ब्रॅंडिंग झाले. जूनपासून सुरू असलेल्या शंभर-सव्वाशे जणांच्या परिश्रमाला यामुळे यशाची किनार लाभली. सुमारे चार लाखांपर्यंत पर्यटकांनी फेस्टिव्हलला भेट दिली.

कोल्हापूर - राज्यातील पहिल्या फ्लॉवर फेस्टिव्हलने कोल्हापूरच्या पर्यटनात भर घातली. राज्यात कोल्हापूरचे ब्रॅंडिंग झाले. जूनपासून सुरू असलेल्या शंभर-सव्वाशे जणांच्या परिश्रमाला यामुळे यशाची किनार लाभली. सुमारे चार लाखांपर्यंत पर्यटकांनी फेस्टिव्हलला भेट दिली. सुमारे अडीच लाखांहून अधिक फुले पाहून येणारे पर्यटक भारावून गेले.

या फेस्टिव्हलची संकल्पना कशा पद्धतीने साकारली, पडद्यामागे काय काय केले. यावर फेस्टिव्हलचे संयोजक केएसबीपीचे सुजय पित्रे यांच्याशी संवाद... 

अशी संकल्पना पुढे आली..
पालकमंत्री चंद्रकांत पाटील काही वर्षांपूर्वी दुबईत गेले. तेथे त्यांनी फ्लॉवर गार्डन पाहिली. तीच संकल्पना त्यांनी ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’च्या निमित्ताने कोल्हापुरात आणली. पुष्प प्रदर्शनाचे आयोजन होते, मात्र, फेस्टिव्हल ही संकल्पनाच वेगळी होती. त्याचे आकर्षण सर्वांना राहील, याची खात्री होती. त्यामुळेच कोल्हापुरात राज्यातील पहिला फ्लॉवर फेस्टिव्हल झाले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

जूनला ठरले; डिसेंबरमध्ये प्रत्यक्षात
‘केएसबीपी’ने फ्लॉवर फेस्टिव्हलची तारीख जूनमध्येच निश्‍चित केली होती. त्याअनुषंगाने आवश्‍यक ते सर्व प्रयत्न सुरू झाले. जिल्ह्यातील सात नर्सरीत फुलांच्या बिया दिल्या. ती फुले डिसेंबरमध्ये बहरतील, याचा अभ्यास केला. याचबरोबर पोलिस गार्डनच्या काही भागात झेंडूसह इतर फुलांची लागवड केली. तीच फुले आज डिसेंबरमध्ये बहरलीत. जूनमध्ये नियोजन केल्यामुळेच डिसेंबरमध्ये फ्लॉवर फेस्टिव्हल यशस्वी झाला.

शंभर जणांच्या टीमचे यश...

‘केएसबीपी’मध्ये असलेल्या सुमारे शंभर जणांच्या टीमच्या परिश्रमातून फ्लॉवर फेस्टिव्हल यशस्वी झाला. फ्लॉवर फेस्टिव्हलमध्ये वेगवेगळ्या मूर्ती, हत्ती, राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा आणि धरणाची प्रतिकृती, वेगवेगळ्या स्पर्धा, या सर्वांचे नियोजन करण्यासाठी आमच्या टीमने मोठे योगदान दिले. फ्लॉवर फेस्टिव्हलला मिळालेला प्रतिदास पाहून सर्वांचे परिश्रमाला यश आल्याचे सुजित पित्रे यांनी सांगितले.

नर्सरींचे सहकार्य महत्त्वाचे...

जिल्ह्यातील सात नर्सरीमधून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांना फ्लॉवर फेस्टिव्हलमध्ये केवळ स्टॉल मोफत दिले, तरीही त्यांनी फुलांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात करून दिली. संजय घोडावत आणि सा. रे. पाटील यांच्या नर्सरीमधूनही कटिंग फुले मिळाली. 

निसर्ग नर्सरी, शैलेश नर्सरी, प्रसाद नर्सरी, अक्षय नर्सरी, अशोक नर्सरी यांचे सहकार्य मिळाले. फेस्टिव्हलमधील नर्सरीच्या फूल झाडांच्या विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसांत चार लाखांहून अधिक उलाढाल झाली.

दिल्ली, उटीतून फुले...
कोल्हापुरातील फ्लॉवर फेस्टिव्हलने राज्यात आपले वेगळेपण निर्माण केले. या फेस्टिव्हलमध्ये उटीमधूनही फुले आणली. कटिंग आणि वाढविलेली फुले अशा दोन्ही प्रकारचा वापर फेस्टिव्हलमध्ये झाला. साधारण चाळीस लाखांपर्यंत फेस्टिव्हलचा खर्च अपेक्षित होता; मात्र सर्वांच्या सहकार्यामुळे हा फ्लॉवर फेस्टिव्हल सहज होऊ शकला. 

Web Title: Kolhapur News Flower Festival