गावागावांत मेस्सी, रोनाल्डो

संभाजी गंडमाळे
मंगळवार, 19 जून 2018

कोल्हापूर - गावाच्या माळावरचं तणकट काढून टाकायला आठ-दहा दिवस... पुन्हा मैदान सपाट करायला काही दिवस श्रमदान करायचे... दगड-धोंडे उचलायला तर सरावापूर्वी किमान तास-अर्धातास घालवायचा... अशा अनेक अडचणींवर मात करत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आता फुटबॉल रुजला आहे

कोल्हापूर - गावाच्या माळावरचं तणकट काढून टाकायला आठ-दहा दिवस... पुन्हा मैदान सपाट करायला काही दिवस श्रमदान करायचे... दगड-धोंडे उचलायला तर सरावापूर्वी किमान तास-अर्धातास घालवायचा... अशा अनेक अडचणींवर मात करत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आता फुटबॉल रुजला आहे. त्या-त्या गावात ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोलेन मेस्सीही तयार झाले आहेत. अर्थात हे खेळाडू त्यांचे फॅन आहेत. 

दरम्यान, फुटबॉल विश्‍वचषकात शुक्रवारी रोनाल्डोने हॅट्ट्रिक नोंदवली आणि सलग चार विश्‍वचषकांत गोल नोंदवणारा जगातील चौथा खेळाडू होण्याचा मान मिळवला. त्यानंतर तर आता रोनाल्डोच्या फॅन्सच्या आनंदाला उधाण आले आहे. रात्री उशिरापर्यंत विश्‍वचषक स्पर्धेतील फुटबॉलचे सामने पहायचे आणि सकाळी उठून भर पावसात सराव करायचा, हा त्यांचा आता नित्यनेम बनला आहे. विशेष म्हणजे सकाळी सराव करताना मेस्सी विरुद्ध रोनाल्डो टीम असाच सामना रंगू लागला आहे. 

वाकरे फुटबॉल क्‍लबचा रवी कांबळे मेस्सी तर याच टीमचा मयूर पाटील रोनाल्डो म्हणून ओळखला जातो. शिरोली फुटबॉल क्‍लबचा संकल्प थोरवत, शुभम चव्हाण मेस्सी तर गणेश मोहिते, विनायक दबडे रोनाल्डो म्हणून ओळखला जातो. आसगाव फुटबॉल क्‍लबचा अक्षय सासने मेस्सी तर अविराज पाटील रोनाल्डो म्हणून ओळखला जातो. वडणगे फुटबॉल क्‍लबचा अशोक चौगले, सौरभ पाटील, ऋतुराज तांबेकर, अक्षय मोरे मेस्सी तर रविराज मोरे, विष्णू गोमाटे, 
कुणाल शेलार रोनाल्डो म्हणून ओळखले जातात. 

फुटबॉलच्या प्रेमाखातर...
केवळ फुटबॉलच्या प्रेमाखातर गावगाड्यातील पोरांची धडपड सुरू आहे. विद्यार्थ्यांपासून ते रिक्षा व्यावसायिक, नोकरदार, सेंट्रिंग-फरशी काम करणाऱ्या पोरांचा त्यात समावेश आहे. सुसज्ज मैदान नसले तरी ते इमाने-इतबारे रोज सराव करतात. फुटबॉलच्या हंगामात तर अगदी फ्लड लाईट लावून डे-नाईट सामन्यांचे आयोजनही होते. 

मेंढरं घेऊन मी निघालोय आता पंढरपूरकडे. पोरांच्या खेळाला पाठबळ मिळावं, याच अपेक्षेतून आम्ही गड्यांनी प्रमोशन केलं. शेवटी आपल्याच मातीतली पोरं आहेत ती.
- बळीराम लांडगे, वडणगे

विद्यार्थी आणि नोकरदारांची आमची टीम. आमच्यातही मेस्सी, रोनाल्डो आहेतच. फुटबॉल विश्‍वचषक एन्जॉय करताना रोजचा सराव मात्र सुरूच ठेवला आहे. 
- संकल्प थोरवत, शिरोली फुटबॉल क्‍लब

आमच्या टीममध्ये महेश भंडारे मेस्सीचा मोठा फॅन आहे. त्याला त्याच नावाने आम्ही सारे ओळखतो. दररोज सकाळी न चुकता सराव सुरूच असतो.
- अनिल साळुंखे, इचलकरंजी फुटबॉल क्‍लब

Web Title: Kolhapur News Football fever in Villages