फुटबॉल प्रेम : शिवाजी पेठ ते रशिया !

सुधाकर काशीद
शुक्रवार, 1 जून 2018

कोल्हापूर - शिवाजी पेठ म्हणजे घराघरांत फुटबॉलपटू आणि मनामनांत फुटबॉलची रग. ही रग व्यक्‍त करण्यासाठी गांधी मैदान आणि शाहू स्टेडियमकडे रजा काढून पावले वळणार, हे अगदी ठरूनच गेलेले. याच फुटबॉल प्रेमापोटी शिवाजी पेठेतील चौघे रशियात होणाऱ्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी जाणार आहेत.

कोल्हापूर - शिवाजी पेठ म्हणजे घराघरांत फुटबॉलपटू आणि मनामनांत फुटबॉलची रग. ही रग व्यक्‍त करण्यासाठी गांधी मैदान आणि शाहू स्टेडियमकडे रजा काढून पावले वळणार, हे अगदी ठरूनच गेलेले. याच फुटबॉल प्रेमापोटी शिवाजी पेठेतील चौघे रशियात होणाऱ्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी जाणार आहेत.

ऑनलाईन तिकिटे मिळण्यासाठी जिवाचा आटापिटा सुरू असताना तीन ते चार वेळा प्रयत्न करून स्पर्धेतील चार सामन्यांची तिकिटे मिळविण्यात ते चौघे यशस्वी ठरले आहेत. २४ जून ते ५ जुलैदरम्यान त्यांच्या फुटबॉल प्रेमाचा हा रशिया दौरा आहे. प्रवासाचा खर्च वेगळाच; पण प्रत्येक सामन्याच्या एका तिकिटासाठी त्यांनी सरासरी १६ हजार रुपये खर्चून तिकिटे घरपोच मिळवली आहेत. शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीत राहणाऱ्याच चौघांचा फुटबॉल शौक रशियापर्यंत जाऊन पोचणार आहे. 

प्रकाश गणपती राऊत त्यांची दोन मुले- दीपक व प्रमोद आणि त्यांचा मित्र अमोल मारुतराव जाधव अशी या चार अस्सल फुटबॉलप्रेमींची नावे आहेत. यातील प्रकाश राऊत व त्यांचा मुलगा दीपक शिवाजी तरुण मंडळाकडून फुटबॉल खेळले आहेत. साऱ्या जगाचे डोळे लागलेल्या अर्जेंटिना, ब्राझील, सर्बिया, नायजेरिया, रशिया या संघांचे सामने त्यांना पाहायला मिळणार आहेत. याशिवाय, नॉक आउट राउंडमधीलही सामने त्यांना पाहायला मिळतील. या माध्यमातून नेमारसारख्या दिग्गज खेळाडूला त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेसाठी रशिया गाठायचे, जगभरातील फुटबॉल खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष पाहायचा, ही त्यांची वर्षभरापासूनची इच्छा होती. पण, विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी तिकीट मिळाले तरच रशियाला जाण्यात अर्थ होता. त्यासाठी त्यांनी प्रथम ‘फिफा’चे आय. डी. मिळविले व ऑनलाईन बुकिंगसाठी चार-चार तास प्रतीक्षा केली. तीन ते चार वेळा केलेल्या प्रयत्नानंतर त्यांना ऑनलाईन तिकिटे बुक करण्यात यश मिळाले. तिकीट निश्‍चितीनंतर विमानाचे बुकिंग करण्यात आले.

आमचे लहानपण आणि तरुणपण फुटबॉल प्रेमात गेले. विश्‍वकरंडक स्पर्धेतील फुटबॉल सामने टीव्हीवर बघत अनेक रात्री जागवल्या; पण एकदा विश्‍वकरंडक फुटबॉल आणि ब्राझीलचा खेळ प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा होती. माझ्या मुलांनी तिकिटासाठी खटपट करून ही संधी मिळवून दिली. 
- प्रकाश गणपती राऊत,
फुटबॉलप्रेमी

चौघांची तिकिटे व फॅन आय. डी. पास घरपोच मिळाले आहेत. या तिकिटावर बारकोड आहे. त्यामुळे त्यांनाच स्टेडियमवर प्रवेश मिळणार आहे. फॅन आय. डी. गळ्यात घालावा लागणार आहे आणि ज्याच्या गळ्यात फॅन आय. डी. त्याला रशियातील पब्लिक ट्रान्स्पोर्टचा प्रवास मोफत असणार आहे. 
- दीपक प्रकाश राऊत
, फुटबॉलप्रेमी

Web Title: Kolhapur news Football Shivaji Peth to Russia special