यंदा राबविणार गडसंवर्धन स्वच्छता मोहीम - खासदार संभाजीराजे छत्रपती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

कोल्हापूर - शिवराज्याभिषेकासाठी दुर्गराज रायगड सज्ज झाला असून, यंदा पाच जूनला आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त ‘गडसंवर्धन स्वच्छता मोहीम’ होत आहे. रायगड विकास प्राधिकरणातर्फे होत असलेल्या मोहिमेत हजारो शिवभक्त सहभागी होतील, अशी माहिती खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी येथे दिली.

कोल्हापूर - शिवराज्याभिषेकासाठी दुर्गराज रायगड सज्ज झाला असून, यंदा पाच जूनला आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त ‘गडसंवर्धन स्वच्छता मोहीम’ होत आहे. रायगड विकास प्राधिकरणातर्फे होत असलेल्या मोहिमेत हजारो शिवभक्त सहभागी होतील, अशी माहिती खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी येथे दिली.

गडावरील निवासस्थानांत राहण्यास व रोपवेतून गडावर ये-जा करण्यासाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांनाच प्राधान्य द्या, असे आवाहनही त्यांनी केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात बैठक झाली.

शिवभक्तांना सूचना

  •  गडावर प्लास्टिक बाटल्या, पिशव्या नको
  •     राजसदरेवर शिवभक्तांची गर्दी नको
  •     होळीच्या माळावर पाच जूनला रात्री आतषबाजी नको

संभाजीराजे म्हणाले, ‘‘प्लास्टिक बाटल्या, पिशव्यांचा खच गडावर पडला आहे. हे चित्र शिवछत्रपतींच्या राजधानीवर न शोभणारे आहे. गड स्वच्छ करण्यासाठी यंदा पाऊल उचलले असून, गड स्वच्छतेत हजारो शिवभक्त सहभागी होतील. त्यासाठीच्या हेल्पलाईनवर राज्यातील साडेनऊशे संस्था संलग्न झाल्या आहेत.’’

सोहळ्याकरिता शिवभक्तांना वेगवेगळे मान दिल्याचेही त्यांनी सांगितले.पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ‘‘शिवशाही गाड्या नाममात्र शुल्कात प्रत्येक जिल्ह्यातून रायगडाकडे रवाना झाल्या पाहिजेत. त्यासाठी राज्य शासनाला विनंती करूया.’’

नगरसेवक महेश सावंत यांनी सोहळ्यासाठी एकवीस हजार रुपयांचा धनादेश समितीकडे सुपूर्द केला. राजू मेवेकरी यांनी अन्नछत्रासाठी तांदूळ देत असल्याचे स्पष्ट केले. समिती अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी आभार मानले. 

संभाजीराजे म्हणतात...

  •     २६ व २७ रोजी गडावरील दरीत स्वयंसेवकांकडून स्वच्छता
  •     पाच जूनला सकाळी सात ते बारा या वेळेत शिवभक्तांकडून स्वच्छता 
  •     गडावर उत्खननात सापडलेल्या वस्तूंचा स्लाईड शो
  •     वॉटर प्युरीफायर मशिनद्वारे शिवभक्तांना शुद्ध पाणीपुरवठा
  •     पुढील वर्षी गडपायथा ते महादरवाजापर्यंत पायऱ्या होणार
  •     गडावर ये-जा करण्यासाठी दोन रस्ते करणार 
Web Title: Kolhapur News Fort conservation Cleanliness campaign this year Sambhajiraje comment