संजय, सुनीलची दिल, दोस्ती, दुनियादारी

लुमाकांत नलवडे
रविवार, 6 ऑगस्ट 2017

समजून घेणे  हीच खरी दोस्ती
कोणता ‘फ्रेन्डशिप डे’ आम्हाला माहिती नाही; पण एकमेकांना समजून घेणे, चांगल्या गुणांचे कौतुक करणे, चुकेल तेथे परखडपणे सांगणे हीच खरी दोस्ती आहे, असे आम्हाला वाटते. एक दिवस नाही, रोजच आमचा ‘फ्रेन्डशिप डे’ असतो, असेही त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

कोल्हापूर - दोघे शाहू खासबागच्या, टाऊन हॉलच्या किंवा व्हिनस कॉर्नरच्या बसथांब्यावर दिसतील. दोघांव्यतिरिक्त तिसरा कोणीही नाही. कोण हे, कोठून आलेत, कोठे चाललेत? याबाबत इतरांना काहीच देणे-घेणे नसते; पण त्यांची दिल, दोस्ती आणि दुनियादारी जगावेगळी आहे. संजय शिवाजी पोवार आणि सुनील अप्पासाहेब सुतार अशा या दोन अंधांच्या दोस्तीबद्दल आजच्या ‘फ्रेन्डशिप डे’निमित्त...

सुनील पोवार. एम.बी.ए., एलएल.बी. हे त्यांचे क्वॉलिफिकेशन. सध्या ते एलएल.एम. करत आहेत. पुढे त्यांना ‘असिस्टंट प्रोफेसर’ बनायचं आहे. संजय पोवार. बी.ए. बी.एड., हे त्यांचे क्वॉलिफिकेशन. सध्या ते महापालिकेच्या अहल्याबाई होळकर शाळेत शिक्षक आहेत. एकमेकांना साथ देत, एकमेकांचे डोळे बनून मैत्री निभावत आहेत. सुनील मुंबईतून कोल्हापुरात आला. अंधांसाठी काम करणाऱ्या नॅब संस्थेत संगणकाचे ज्ञान देऊ लागला. तेथे कामानिमित्त गेलेल्या संजयबरोबर त्यांची ओळख झाली. संजय देवकर पाणंद परिसरात राहणारा; तर सुनील राजोपाध्येनगरात राहणारा. त्यामुळे ही दोस्ती आणखी घट्ट झाली. एकाच मार्गावरून ये-जा करण्यासाठी दोघे एकमेकांचा आधार बनले. एखाद्या परीक्षेचा फॉर्म भरायचा असल्यास संजय सुनीलची मदत घेत होता. सुनीलला काही आर्थिक मदत पाहिजे असल्यास संजय देत होते. बघताबघता दोघांचेही विचार एकमेकांना पटले. बुद्धिबळाच्या स्पर्धेसाठी त्यांनी एकत्रितपणे हैदराबाद, नागपूर, नाशिक अशा अनेक ठिकाणी दौरे केले. त्यातून त्यांची दोस्तीची वीण आणखी घट्ट झाली. पुढे सुनील आणि संजय एकमेकांचे जिगरी दोस्त झाले. मनातील भावना व्यक्त करू लागले. एकमेकांच्या आयुष्यावर बोलू लागले. संजय मूळचा कोल्हापूरचा. थोडा धाडसी. त्यामुळे रात्री उशीर झाला तर तो सुनीलला राजोपाध्येनगरात घरी सोडून परत आपल्या घरी देवकर पाणंदला येतो. ‘आम्ही दोघे मस्त आहोत,’ हे त्यांच्या तोंडचे वाक्‍य डोळसांनाही आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे.

आजही रोज घरातून बाहेर पडताना एकमेकांना फोन करतात. एकाच बसथांब्यावरून पुढे शहरात प्रवास करतात. त्यांच्या ड्रेसवरून त्यांच्यात दडलेल्या बुद्धिमत्तेचा, दातृत्वाचा अंदाजच इतरांना येत नाही. त्यामुळेच बसथांब्यावर काहीजण त्यांना बाजूलाही  करतात. तरीही ते अपमान मानत नाहीत. हो.. म्हणतात आणि पुढे आपला दिनक्रम सुरू ठेवतात. फारच राग आला तर एकमेकांत शेअर करतात आणि विसरून जातात.

एलएल.एम.साठी २५ हजारांची शिष्यवृत्ती
सुनील अतिशय हुशार आहेत. रविवारी ते एका वकिलांकडे काम करतात; तर इतर वेळी नॅबमध्ये संगणक शिक्षक म्हणून काम करतात. त्यांना संगणकाचे चांगले ज्ञान आहे. नुकतेच त्यांना पुढील शिक्षणासाठी अब्दुल कलाम यांच्या नावे देण्यात येणारी २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली आहे.

Web Title: kolhapur news friendship