पहाटेचा जुगार, अनेकजण कंगाल

पहाटेचा जुगार, अनेकजण कंगाल

कोल्हापूर - काळेधंदेवाल्यांची दहशत अनुभवतच मध्यवर्ती एस. टी. स्थानकावर पहाट उगवते आणि पहाटे साडेतीन ते साडेपाच या वेळेत शंभर-दोनशे जणांचा खिसा रिकामा करून, या काळेधंदेवाल्यांची गॅंग किमान २० ते २५ हजाराची कमाई करते. पहाटे फक्‍त दोन तासांसाठी एस. टी. स्थानक परिसरात जुगाराचा हा पट मांडला जातो. यात खेळणारा कंगाल तर होतोच; पण काळेधंदेवाल्यांची दहशत म्हणजे काय असते, याचा थरार या दोन तासांत येथे अनुभवता येतो. 

एस. टी. स्थानकावर मुख्य गेटलगत पहाटे साडेतीन ते साडेपाच या अवेळीच हा जुगार रोज न चुकता भरतो. अर्थात भर रस्त्यावर भरणारा हा जुगार फक्‍त पोलिसांना कसा दिसत नाही, हाच प्रश्‍न येथे प्रत्येकाच्या मनात येतो. 

या जुगारवाल्यांची किमान २० ते २५ जणांची टोळी आहे. त्यांतील बहुतेकांच्या पाठीवर ते प्रवासी भासावेत, अशा सॅक आहेत. पहिल्यांदा तेच हा जुगाळ खेळायला उभारतात. इतरांना त्याकडे खेचून घेतात आणि नजरबंदी म्हणा किंवा हातचलाखी करत बघता बघता समोरच्याचा खिसा रिकामा करतात. आपण फसले गेलोय हे ध्यानात आल्यानंतर जाब विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर दहशतीचा वापर करतात. अक्षरश: मानगूट धरून ते जाब विचारणाऱ्याला हाकलून लावतात. जुगारात पैसे गेले, यापेक्षा या काळेधंदेवाल्यांच्या तावडीतून आपण सुटलो, असे म्हणत लोक निमूटपणे हे सारे सहन करतात. 

पहाटे साडेतीन वाजता एस. टी. स्थानकाच्या मुख्य गेटजवळच एक टेबल मांडले जाते. त्यावर एलईडी लाईट व रंगीत छत्री लावली जाते. टेबलावर घड्याळे, मोबाईल सेट मांडले जातात. त्यांची विक्री येथे सुरू आहे, असे भासवले जाते; पण प्रत्यक्षात तेथे पन्नासला शंभर, शंभरला दोनशे अशा चिठ्ठी जुगाराची मांडणी केली जाते. सुरवातीला प्रत्येकाला पन्नासला शंभर रुपये मिळतात आणि ते या जुगारात अडकतात. जुगारवाले कोणालाही मध्येच जुगार सोडून जाऊ देत नाहीत. तसा कोणी प्रयत्न केल्यास त्याला भर रस्त्यात चोप देतात. जुगारवाल्यांची दहशत इतकी आहे, की कोणीही काय झाले, म्हणून मदतीला येऊ लागला तर त्याला फरपटत नेऊन लांब घालवतात. 

पहाटे फक्‍त दोन तास हा जुगार चालतो. साडेपाचला जुगार थांबतो. मुंबई पासिंगच्या एका मोटारीतून सहा ते सातजण निघून जातात. यांना पोलिसांची भीती वाटत नाही. इतर लोकांना तर ते जुमानतच नाहीत. फक्‍त दहशतीच्या जोरावर रोज एस. टी. स्थानकाच्या मुख्य दारात (बेकरीसमोर) हे सुरू आहे. पोलिसांचे लक्ष गेले तरच हे थांबू शकणार आहे. 

एसटी स्थानकाजवळ पहाटे चालणाऱ्या या जुगाराबद्दल माझ्यापर्यंत तक्रारी आल्या होत्या. पहाटे पाचच्या सुमारास मी स्वत: या जुगाराच्या ठिकाणी जाऊन पाचसहा दिवसांपूर्वी कारवाई केली आहे. अजून पोलिसांची नजर चुकवून त्यांचा जुगार चालू असेल तर कारवाई केली जाईल.
- संजय मोरे,
पोलिस निरीक्षक, शाहूपुरी पोलिस ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com