शिशे के घर में रहनेवाले स्टाईल में रहते हैं...! 

शिशे के घर में रहनेवाले स्टाईल में रहते हैं...! 

कोल्हापूर - शिशे के घरो में रहनेवाले दुसरो पर पत्थर नहीं फेका करते. चिनॉय शेठ. बी. आर. चोप्रा यांच्या "वक्त' चित्रपटातील हा डायलॉग हातात विशिष्ट स्टाईलने धरलेला पाईप ओढत राजकुमार म्हणतो तेव्हा चित्रपटगृहात शिट्ट्यांचा पाऊस पडतो; मात्र चित्रपटातील "शिशे के घरो में'ची हीच गोष्ट आज वास्तवात उतरली आहे. मेट्रोपॉलिस, मेगा सिटीज, लहान शहरे असोत की, सर्वाधिक नागरिकरण झालेले भाग असो, ग्लास हाऊसेस किंवा हाऊसेस विथ ग्लास फर्निचर मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहेत. अगदी कोल्हापूरही याला अपवाद नाही. 

अनेक हौशी, सौंदर्यासक्त, घरासाठी पैसा खर्च करणारे लोक ग्लास फर्निचर, ग्लासशी संबंधित घटकांना प्राधान्य देत आहेत. यात काचेच्या भिंती, टेबल, टिपॉय, डायनिंग, छत, पार्टिशन्स, खिडक्‍या, टॉयलेट, बाथरुम, फ्लोअरिंग अशा अनेक घटकांचा समावेश आहे. पूर्वी घर उभे करताना माती, वाळू, सिमेंट, विटा, सळी, लाकूड आदी पारंपरिक घटकांचा वापर होत असे. काचेचा वापर हा ग्लास किंवा एखाद्या टिपॉय, खिडकीच्या तावदानापुरता मर्यादित असे. आता मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्लास हाऊस ही संकल्पनाच श्रीमंतांपासून ते सामान्यांच्या कक्षेत आली आहे. 

आर्किटेक्‍ट, इंटिरियर डिझाईनर्स म्हणतात, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात काचेची उत्पादने उपलब्ध आहेत. ही काच वेगवेगळ्या स्टाईल, रंग, रचना, पृष्ठभागानुसार मिळते. ग्लासच्या वापरामुळे आकर्षक परिणाम साधतो. कायम थंड राहणाऱ्या जागा उर्जेने भरून जातात. प्रकाशाच्या परावर्तनामुळे अंतर्भाग मोठा भासतो. वस्तू उठावदार दिसतात. एकप्रकारे अंतर्बाह्य "कनेक्‍शन' निर्माण होते. काच ही इको-फ्रेंडली आहे. ती उष्णता शोषून घेते अन्‌ परावर्तीतही करते. यातून "ग्रीन आर्किटेक्‍चर'चा परिणाम साधतो. त्यामुळेच अनेक लोक फर्निचर, वॉल, पार्टिशन्ससाठी काचेचा वापर करू लागले आहेत. तुम्ही काच घरी घेऊन आलात की, जीवनातील काही कल्पना प्रत्यक्षात साकारू शकता. छत, जीना, घुमटाकार आकार, टेबल, कपाटे तुम्ही काचेच्या वापराने खुलवू शकता. 

असं म्हणतात की, आजूबाजूच्या परिसराचा प्रभाव हा आपल्या जगण्यावर टाकतो. याकरिता अनेक लोक उत्कृष्ट वास्तुरचनेचा आग्रह धरतात. घर आकर्षकरीत्या सजवितात. पूर्वी हे करण्यासाठी लाकूड, ऍक्रेलिक, कापड आदींचा वापर होत असे. आता काचेमुळे इंटिरियर डिझाईन कल्पनेपेक्षाही अधिक सजविता येते. लेसर कटिंगचा वापर करून काचेवर आपल्याला क्‍लिष्ट रचना सुलभ साकारता येतात. आर्किटेक्‍ट म्हणतात, याकरिता तुम्ही संवेदनशील असायला हवे, वागण्यात लिनता हवी. थोडक्‍यात काय, तर तुमचे व्यक्तिमत्त्व नेमके कसे आहे, हे काचेच्या वापरामुळे लक्षात येते. 

काच सुरक्षित आहे? 
इंटिरियरसाठी काचेचा भरपूर वापर करण्यास अजूनही काही लोक घाबरतात. ती तडकली तर इजा होईल, असे अनेकांना वाटते; पण काळजीचे काही कारण नाही. आज बाजारपेठेत अग्निप्रतिबंधक, न तडकणाऱ्या काचांचे पॅनेल्स मिळतात. 4-6 ते 8 मि.मी. किंवा 10 ते 12 मि.मी. जाडीच्या, मध्ये पातळ फिल्म असणाऱ्या काचाही मिळतात. अतिशय कठीण काचाही उपलब्ध आहेत. जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे, फाईल्स, पैसे, दागिने आदी सुरक्षित ठेवता येतील. 

काही वाद 
अनेक शहरांत संपूर्ण काचेचा वापर असणाऱ्या बिल्डिंग्ज, घरे उभी राहत असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात सूर्याची किरणे "ट्रॅप' होतात. यामुळे उष्णता वाढते, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे; मात्र हे टाळण्यासाठी इमारतीचे ठिकाणही महत्त्वाचे ठरते. आर्किटेक्‍ट म्हणतात, तुम्ही इमारत जेव्हा उभी करता तेव्हा पूर्व, पश्‍चिम दिशेला काचेचा वापर थोडा कमी करू शकता. जेणेकरून परावर्तनामुळे उष्णतेची वाढ टाळता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com