‘गोकुळ’ला उपनिबंधकांची ‘क्‍लीन चीट’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याची प्रक्रिया कायदेशीरच आहे; पण प्रत्यक्ष सभेत झालेल्या वादाबाबत हस्तक्षेप फक्त सहकार न्यायालयच करू शकते,’ असा निष्कर्ष काढत विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील सिरापूरकर यांनी कायद्याचा आधार घेत संघालाच ‘क्‍लीन चिट’ दिली.

कोल्हापूर - गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याची प्रक्रिया कायदेशीरच आहे; पण प्रत्यक्ष सभेत झालेल्या वादाबाबत हस्तक्षेप फक्त सहकार न्यायालयच करू शकते,’ असा निष्कर्ष काढत विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील सिरापूरकर यांनी कायद्याचा आधार घेत संघालाच ‘क्‍लीन चिट’ दिली.

‘गोकुळ’च्या १५ सप्टेंबरला झालेल्या सभेत अहवालातील विषयपत्रिका न वाचताच तो मंजूर का ? असा सवाल माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केल्यानंतर सभासदांनी ‘मंजूर-मंजूर’चा नारा दिला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता सभेचे कामकाज गुंडाळले. श्री. महाडिक संघाचे संचालक किंवा कर्मचारी नसताना त्यांनी केलेल्या कृतीविरोधात जिल्ह्यातील २९ संस्थांसह आमदार सतेज पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) श्री. सिरापूरकर यांच्याकडे तक्रार केली होती.

सभेच्या कामकाजाशिवाय इतर आठ तक्रारींचा समावेश त्यात होता.
तक्रारीच्या अनुषंगाने श्री. सिरापूरकर यांनी सहनिबंधक (दुग्ध) अरुण चौगले यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. श्री. चौगले यांनी केलेल्या चौकशीत अहवाल वाचन श्री. महाडिक यांनी केले असताना इतिवृत्तात मात्र सभेचे संचलन अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी केले असे लिहिले होते. चौकशीचा अहवाल श्री. चौगले यांनी श्री. सिरापूरकर यांच्याकडे सादर केला.

या अहवालावर निर्णय काय लागणार याविषयी उत्सुकता असतानाच प्रत्यक्ष सभेत काय झाले यात हस्तक्षेप करण्याचा किंवा चौकशी करण्याचा अधिकार कायद्याने उपनिबंधक यांना नसल्याचे सांगत श्री. सिरापूरकर यांनी सहकार न्यायालयात दाद मागता येईल असा निर्णय दिला आहे. आजच या निर्णयाच्या प्रती संबंधित संस्थांसह सहनिबंधक चौगले व ‘गोकुळ’ला टपालाद्‌वारे पाठवल्या. 

तक्रारीबाबतही स्पष्टीकरण
तक्रारदार २९ संस्थांनी इतर विविध आठ विषयांबाबत श्री. सिरापूरकर यांच्याकडे तक्रार केली होती. या आठही तक्रारींबाबत सहनिबंधकांचा आलेला अभिप्राय व त्यावर घेतलेल्या निर्णयाचा तक्ताही श्री. सिरापूरकर यांनी संबंधित संस्थांना पोस्टाने पाठवला आहे. त्याच्या प्रती ‘गोकुळ’ व सहनिबंधक चौगले यांना पाठवण्यात आल्या आहेत.

आंधळं दळतंय...
सभेला सुमारे हजारभर संस्था प्रतिनिधी, कर्मचारी, पत्रकार, वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी सभेत काय झाले याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या; पण फक्त कागदपत्रे रंगवून बेकायदेशीर झालेली सभा कायदेशीर कशी होते ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘गोकुळ’ची सभा आहे. ‘आंधळं दळतंय....आणि कुत्रं पीठ खातंयं’ अशीच अवस्था सभेची झाली आहे.

Web Title: Kolhapur news Gokul General Body meeting issue