लोणी, पावडर वाहतुकीत सावळागोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध संघात (गोकुळ) अतिरिक्त दुधापासून तयार होणाऱ्या लोण्याची कोल्ड स्टोअरेजपर्यंत वाहतूक वातानुकूलित यंत्रणा असलेल्या वाहनाऐवजी साध्या वाहनातून करून, त्याचे भाडेमात्र वातानुकूलित वाहनाचे घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू असूनही व्यवस्थापन किंवा संघाच्या लेखा परीक्षकांच्याही लक्षात हा प्रकार न आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध संघात (गोकुळ) अतिरिक्त दुधापासून तयार होणाऱ्या लोण्याची कोल्ड स्टोअरेजपर्यंत वाहतूक वातानुकूलित यंत्रणा असलेल्या वाहनाऐवजी साध्या वाहनातून करून, त्याचे भाडेमात्र वातानुकूलित वाहनाचे घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू असूनही व्यवस्थापन किंवा संघाच्या लेखा परीक्षकांच्याही लक्षात हा प्रकार न आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

"गोकुळ'कडे संकलित होणाऱ्या गाईच्या अतिरिक्त दुधापासून लोणी व दूधपावडर तयार केली जाते. संघाकडे तयार उपपदार्थ ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेज नाही. त्यामुळे हे पदार्थ कराड, पुणे व सातारा जिल्ह्यात भाड्याने घेतलेल्या कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवले जातात. या स्टोअरेजपर्यंत हे उपपदार्थ पोचवण्यासाठी वाहनांचा ठेका देण्यात आला आहे. हा ठेका देताना ही वाहने वातानुकूलित यंत्रणेसह सज्ज असावीत, अशी अट आहे; पण प्रत्यक्षात साध्या वाहनातूनच याची वाहतूक करून भाड्यापोटी लाखो रुपयांवर डल्ला मारण्याचा प्रकार सुरू आहे. 

अशी वाहने पुरवण्याचा ठेका एका माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालकांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात गाड्या या दुसऱ्याच एका वजनदार संचालकांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ठेका माजी अध्यक्षांच्या कार्यकर्त्यांच्या नावावर आहे; पण प्रत्यक्षात दुसरेच लोक वाहतूक करतात. ही वाहने "रेफ्रिजरेटेड' असावीत असा लेखी नियम आहे; पण तो धाब्यावर बसवण्यात आला आहे. परिणामी साध्या वाहनातून वाहतूक केलेले हे पदार्थ खराब होण्याचा धोका आहे. प्रत्यक्षात या वाहनांचे बिलमात्र "रेफ्रिजरेटेड' वाहनांप्रमाणे निघते. फक्त वाहनभाड्यावर संघाचे गेल्या वर्षी 2.7 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यावर्षी म्हणजे 2017 मध्ये यावर 2 कोटी 15 लाख 92 हजार रुपये खर्च झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

संघाचे अध्यक्ष, संचालक व प्रशासनाने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले की हा प्रकार त्यांना माहीतच नाही, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याची चौकशी होईलही; पण यापूर्वी दिलेले चुकीचे भाडे वसूल होणार का ? हाच खरा प्रश्‍न आहे. 

ठेकेदाराची दहशत 
अशी वाहने पुरवण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराची प्रचंड दहशत संघात आहे. एखाद्या अधिकाऱ्याने या ठेकेदाराचे बिल काढले नाही किंवा काही काम अडवले, तर संबंधित अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्यापर्यंतची मजल या ठेकेदाराची आहे. सद्यःस्थितीत ही वाहतूक करणारी वाहने स्क्रॅपमध्येही कोणी घेणार नाही अशी स्थिती असताना त्यावर कोट्यवधी रुपयांची उधळण सुरू आहे. 

"गोकूळ'कडे कोल्ड स्टोअरेज नसल्याने भाड्याने घेतले. 
कराड, पुणे व सातारा जिल्ह्यात साठवणूक. 
उपपदार्थ पोचवण्यासाठी वाहनांना दिला ठेका 
वाहने वातानुकूलितची अट, प्रत्यक्षात साध्या वाहनातूनच वाहतूक 
भाड्यापोटी लाखो रुपयांवर डल्ला मारण्याचा प्रकार 
भाड्यापोटी गेल्यावर्षी 2.7 कोटी रुपये खर्च 
2017 मध्ये 2 कोटी 15 लाख 92 हजार रुपये खर्च. 

Web Title: kolhapur news gokul milk