केडीसीसी बावडा शाखेत सोने तारण अपहार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

कोल्हापूर - तारण ठेवलेले एक किलोहून अधिक सोन्याचे दागिने परस्पर बदलून ३२ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कसबा बावड्याचा शाखाधिकारी, रोखपालासह सराफावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

कोल्हापूर - तारण ठेवलेले एक किलोहून अधिक सोन्याचे दागिने परस्पर बदलून ३२ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कसबा बावड्याचा शाखाधिकारी, रोखपालासह सराफावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

याबाबतची फिर्याद बॅंकेचे तपासणी अधिकारी रामगोंडा भुजगोंडा पाटील (रा. सांगवडे, ता. करवीर) यांनी दिली. त्यानुसार शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (५६, रा. शिये, ता. करवीर), रोखपाल परशराम कल्लाप्पा नाईक (रा. साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) आणि सराफ सन्मुख आनंदराव ढेरे (रा. कसबा बावडा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी दिलेली माहिती अशी - बॅंकेच्या कसबा बावडा शाखेतून शिये येथील वंदना मोरे यांनी सोने तारण कर्ज घेतले होते. त्या आठ दिवसांपूर्वी कर्जफेडीसाठी बॅंकेत गेल्या. त्यावेळी त्यांना तारण ठेवलेले सोने देण्यात आले. ते सोने आपले नसल्याचा त्यांनी दावा केला. त्यांच्या या तक्रारीनंतर ते सोने बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी तपासून घेतले. त्यावेळी ते सोने बनावट असल्याचे पुढे आले. या प्रकरणी बॅंकेतर्फे शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. 

तक्रारीची चौकशी सहायक पोलिस निरीक्षक भांगे यांच्याकडून सुरू होती. बॅंकेकडूनही सखोल चौकशी सुरू झाली. त्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून रामगोंडा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली. या काळात बॅंकेचे शाखाधिकारी संभाजी पाटील, रोखपाल परशराम नाईक होते. तारण जिन्नसाची तपासणीचे काम सराफ सन्मुख ढेरे याच्याकडे होते. 

सोने तारण कर्ज प्रकरणांची पडताळणी रामगोंडा पाटील यांनी केली. त्यात त्यांना एप्रिल २०१७ ते ११ जून २०१८ अखेर सोने तारण केलेल्या प्रकरणात घोळ दिसला. तारण ठेवलेल्या एकूण एक किलोहून अधिकचे सोन्याचे दागिने परस्पर बदलून त्या जागी बनावट जिन्नस ठेवून खोट्या स्वाक्षऱ्यांद्वारे तब्बल ३२ लाखांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार आज सायंकाळी पाटील यांनी फिर्याद दिली. त्यानुसार या तिघांवर कारकुनाकडून फसवणूक, मुद्देमाल परस्पर बदलणे, फसवणूक करणे, दुसऱ्याच्या मालमत्तेचा वापर करणे आदी कलम ४०६, ४०८, ४२०, ४६७ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला. 

संगनमताने फसवणूक
बॅंकेत ३१ ग्राहकांनी ठेवलेले सुमारे १०१ तोळे अर्थात एक किलो १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बॅंकेचा शाखाधिकारी, रोखपालासह सराफाने संगनमताने बदलले. खोटी कागदपत्रे, स्वाक्षऱ्यांआधारे कर्ज प्रकरणातून ३२ लाखांहून अधिकचा अपहार केल्याचा ठपका तपासणी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. तिघांना अटक करून पुढील चौकशी करण्यात येईल, असे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Gold mortgage impairment in KDCC Bawada Bank