माल वाहतुक करणाऱ्या गाड्यांची हवा सोडली 

शिवाजी यादव
रविवार, 22 जुलै 2018

महामार्गावर 16 हून अधिक माल वाहतुक करणाऱ्या गाड्यांची हवा सोडली तर कांही ठिकाणी माल खाली उतरविला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, गांधीनगर, शाहू मार्केट यार्ड, लक्ष्मीपुरी येथील माल वाहतुक पूर्णतः ठप्प झाली. 

कोल्हापूर - पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावेत, माल वाहतुकदारांचे ओझे कमी करावे यासह विविध मागण्यांसाठी माल वाहतुकदारांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनास तिसऱ्या दिवशी तीव्रता वाढली. महामार्गावर 16 हून अधिक माल वाहतुक करणाऱ्या गाड्यांची हवा सोडली तर कांही ठिकाणी माल खाली उतरविला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, गांधीनगर, शाहू मार्केट यार्ड, लक्ष्मीपुरी येथील माल वाहतुक पूर्णतः ठप्प झाली. 

आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी शिरोली ते टोप संभापूर या भागात मोटर सायकल रॅली काढून जेथून औद्योगिक माल वाहतुक होत होती तिच बंद पाडली, पाच वाहनातील माल उतरविला तसेच चाकातील हवाही सोडली. तर गांधीनगर ते उंचगाव या मार्गावर कांही कार्यकर्ते सुमो गाडीतून फिरून माल वाहतुक करणाऱ्या गाड्या अडवत होते या भागात सहा ठिकाणी हवा सोडण्यात आली. तर विकासवाडी येथील जाजल पंपाजवळ जिल्हा लॉरी असोसिएशनचे पदाधिकारी थांबून होते तर कांहीनी गाडीतून राष्ट्रीय महामार्गावर फेरी मारली.  याचवेळी केरळ, तामिळनाडू कर्नाटककडून येणा-जाणाऱ्या माल वाहतुकीच्या गाड्या अडवल्या.

प्रत्येकाला आंदोलन वाहतुकदारांच्या हिताच्या मागण्यांसाठी आहे. त्यामुळे माल वाहतुक थांबवा असे आवाहन केले. मात्र ज्यांनी प्रतिसाद दिला नाही अशांच्या गाड्याच्या चाकातील हवा सोडण्यात आली तर कांही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

उजळाईवाडीनजीक हा गोंधळ सुरू होता. यावेळी कांहीनी आराम बसची वाहतुकही अडविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर दिवसभर माल वाहतुकदार विविध मार्गावर माल वाहतुक करणाऱ्या गाड्या अडविण्यासाठी थांबून होते. 

जिल्ह्यात जवळपास 50 कोटी रूपयांची माल वाहतुक ठप्प झाली. सरकारने अजूनही मागन्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे माल वाहतुकदारांचा संयम सुटण्याची वाट सरकारने पाहू नये अन्यथा आंदोलन चिघळल्यास महागाईत भर पडू शकते. त्यामुळे मालवाहतुकदारांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात.''

- सुभाष जाधव, 

जिल्हाध्यक्ष, जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएसन 

वाहतुकदारांच्या मागण्या अशा -

  • इंधन दरावर सरकारी नियंत्रण असावे. 
  • डिझेल पेट्रोल दरवाढ कमी करा, 
  • पेट्रोल डिझेलचा जीएसएसटीत समावेश करा, 
  • 54 टक्के करांचा भार कमी करा 
  • टोल रद्द करावा 
  • आयकर विषयक 44 ए कलम रद्द करा 

संपात सहभागी संघटना अशा -
कोल्हापूर लॉरी वाळू वाहतुक संघटना, बॉक्‍साईड ट्रक वाहतुकदार, लोकल मालट्रक वाहतुकदार, संगटना , गांधी नगर गुडस ट्रान्सपोर्ट, असोसिएसन , गांधीनगर मोटर मालक ट्रक असोसिएशन, शिरोली नागाव, ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, यांच्यासह सर्व तालुका माल ट्रक वाहतुकदार संघटना, निपाणी गुडस ट्रान्सोपोर्ट असोसिएशन काळी पिवळी टॅक्‍सी युनियन संपात सहभागी आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Goods Transport strike