विचारवंतांच्या हत्यांबाबत सरकार गंभीर नाही - पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

कोल्हापूर - 'ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे आरोपी सापडत नाहीत, ही पोलिसांच्या दृष्टीने आणि सरकारच्या दृष्टीनेही शरमेची बाब आहे. विचारवंतांच्या हत्या होऊनही सरकार याबाबतीत गंभीर नाही, तपासात सातत्य नाही,' असा आरोप प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केला आहे. पानसरे हत्येप्रकरणी विशेष पथकातील तपास अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करा, या तपासावर पूर्ण वेळ काम करणारा अधिकारी नेमावा आणि फरारी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त करावे, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांच्याकडे केली.

पाटील म्हणाले, 'या प्रकरणातील दोन फरारी आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर या दोघांचे फोटो प्रत्येक पोलिस ठाण्यात फरारी आरोपी म्हणून लावा, असे आश्‍वासन दिले. पण त्याचे पुढे काय झाले? हे फोटो कोणत्याच ठाण्यात नाहीत. त्यामुळे सरकार आणि पोलिस अधिकारी याबाबतीत गंभीर नाहीत, असा समज आहे.'' याबाबतीत तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलू, तातडीने पूर्णवेळ काम करणारा तपास अधिकारी नेमण्यासाठी प्रयत्न करू. फरार आरोपींच्या शोध मोहिमेसाठी विशेष पथक त्वरित नियुक्त करू, असे आश्‍वासन मोहिते यांनी दिले.

Web Title: kolhapur news The government is not serious about killing the ideologues