गावकीच्या आखाड्यात मातब्बरांची कसोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत काही आमदार, माजी आमदार यांच्या मूळ गावातील निवडणुका होत असल्याने गावावर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी या नेत्यांनी गावातच तळ ठोकला आहे. 

कोल्हापूर - ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत काही आमदार, माजी आमदार यांच्या मूळ गावातील निवडणुका होत असल्याने गावावर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी या नेत्यांनी गावातच तळ ठोकला आहे. 

आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे, पी. डी. धुंदरे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदूराव चौगले, ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर या नेत्यांच्या गावांतच निवडणुकीचे धूमशान आहे. गावातील सत्ता मिळवण्यासाठी या नेत्यांचा कस लागणार आहे. भुदरगड तालुक्‍यातील माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी आपल्या तिरवडे गावची निवडणूक बिनविरोध करून गावांवर वर्चस्व कायम ठेवले आहे. 

शिरोली पुलाची (ता. हातकणंगले), पाचगाव, उचगाव, उजळाईवाडी, कणेरीवाडी, गांधीनगर (दक्षिण) व आजरा तालुक्‍यातील उत्तूर येथे आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. शिरोली पुलाची येथे तर महाडिक विरोधातील सर्वांना एकत्र करून पाटील यांनी मोट बांधल्याने महाडिक पिता-पुत्र यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

शिरोळ
या तालुक्‍यात नेत्यांच्या गावची निवडणूक नाही, पण खासदार राजू शेट्टी विरुद्ध आमदार उल्हास पाटील संघर्ष कायम आहे. तालुक्‍यात १४ गावांपैकी ५ गावच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित गावांवर वर्चस्वासाठी या दोन प्रमुख नेत्यांच्या जोर-बैठका सुरू आहेत.

पन्हाळा
आमदार चंद्रदीप नरके यांचे कसबा बोरगाव, जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील यांचे आसुर्ले व कुंभीचे माजी संचालक प्रकाश पाटील यांचे पाटपन्हाळा या गावांची निवडणूक आहे. आसुर्लेत तर श्री. पाटील यांचे बंधू भगवान हे सरपंचपदाचे उमेदवार असल्याने त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. बहिरेवाडीत माजी मंत्री विनय कोरे यांच्याच दोन गटांत संघर्ष आहे. इतर तालुक्‍यांतही कोरे विरुद्ध कोरे अशा लढती आहेत. तालुक्‍यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत.

राधानगरी
तालुक्‍यातील दिग्गज नेते स्वतः प्रचारात उतरल्याने ५६ गावांच्या निवडणुकीत रंगत आली आहे. ‘गोकुळ’चे संचालक डोंगळे यांचे घोटवडे, धुंदरे यांचे राशिवडे, ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांचे कौलव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कै. अण्णासाहेब नवणे यांचे धामोड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. यांचे सोळांकूर, हिंदूराव चौगले यांचे ठिपकुर्ली या मोठ्या गावांत निवडणुकीचे धूमशान सुरू आहे. गावांवर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी हे नेते प्रयत्नशील आहेत. 

भुदरगड
तालुक्‍यातील ३७ पैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्‍याचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या मुदाळमध्ये त्यांची कसोटी लागली आहे. कारखान्यातील विजयाने त्यांच्यासह गटाचा आत्मविश्‍वास दुणावला आहे, तो कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

कागल
माजी आमदार संजय घाटगे यांच्या व्हन्नाळी गावची निवडणूक चर्चेत आहे. तालुक्‍यातील २६ पैकी एक सरपंच व ११ सदस्य बिनविरोध झाले आहेत. शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांच्या कसबा सांगावमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. तालुक्‍यात ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार हसन मुश्रीफ, संजय मंडलिक हेही गावांवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. 

करवीर
दोन विधानसभा मतदार संघांत विभागलेल्या या तालुक्‍यातील मोठ्या गावांची निवडणूक होत आहे. दक्षिणमध्ये पाचगाव, उचगाव, गांधीनगर, उजळाईवाडी, कणेरीवाडी, चुये अशा मोठ्या गावांत वर्चस्व ठेवण्यासाठी आमदार सतेज पाटील व अमल महाडिक प्रयत्नशील आहेत. उचगावची निवडणूक या दोघांच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. जन्मभूमी बावडा असली तरी मला उचगावने सांभाळले, असे सतेज पाटील नेहमी म्हणतात. पण जिल्हा परिषद निवडणुकीत या गावांनी त्यांना धक्का दिला. पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गांधीनगरमध्येही या दोघांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. विधानसभा व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत इथले मतदार भाजपच्या मागे राहिले. यावेळी चित्र बदलण्याचा पाटील यांचा प्रयत्न आहे. 
करवीर विधानसभेत आमदार चंद्रदीप नरके व माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाची कसोटी आहे. वडणगे, परिते, कसबा बीड अशा मोठ्या गावांची निवडणूक आहे. वडणगेत पी. एन. समर्थक बी. एच. पाटील यांच्यादृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. परिते हे पी. एन. यांचे पुत्र राहुल यांच्या जिल्हा परिषद गटात येत असल्याने तिथे त्यांनी कंबर कसली आहे. कसबा बीडमध्ये सरपंचपदासाठी ‘गोकुळ’चे संचालक सत्यजित पाटील स्वतः रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे.

आजरा
तालुक्‍यातील उत्तूर या सर्वात मोठ्या गावच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील व महाडिक यांच्यातील राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे व त्यांचेचे नातेवाईक असलेले ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे एकमेकांसमोर ठाकले आहेत. तालुक्‍यातील ३१ गावांत निवडणुकीचा धुरळा उडत आहे.

शाहूवाडी
आमदार सत्यजित पाटील यांचे सरूड, जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील यांचे भेडसगाव, विजय बोरगे यांचे कडवे व सौ. आकांक्षा पाटील यांच्या साळशी गावची निवडणूक आहे. त्यामुळे या नेत्यांची गावावर वर्चस्व मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी सुरू आहे. तालुक्‍याचे ठिकाण असलेल्या शाहूवाडीचीही निवडणूक होत आहे.

हातकणंगले
माजी खासदार निवेदिता माने यांचे रुकडी, आवाडे गटाचा प्रभाव असलेले रेंदाळ, आमदार अमल महाडिक यांचे शिरोली पुलाची, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांचे आळते, तसेच अंबप, घुणकी, भादोले या मोठ्या गावांची निवडणूक होत आहे. शिरोलीत महाडिक विरोधातील सर्वांना एकत्र आणण्यात यश आले आहे. त्यात एकमेकांविरोधात असलेले खवरे बंधू, महेश चव्हाण यांनी मोट बांधली आहे. सरपंचपदासाठी खवरे, करपे यांच्यात सामना असला तरी लढत खवरे विरुद्ध महाडिक अशीच होत आहे. आळते येथे इंगवले यांना घेरण्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. रुकडीत माने गट आपला प्रभाव कायम ठेवेल, असे चित्र आहे. रेंदाळची निवडणूक आवाडेंच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कोरोची व तारदाळ या दोन मोठ्या गावांचीही निवडणूक होत आहे. 

गडहिंग्लज
आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या दृष्टीने नेसरीची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील महागाववर वर्चस्व राहावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीचे नेते बी. एन. पाटील-मुगळीकर यांच्या मुगळीत त्यांच्या नेतृत्वाची कसोटी आहे. तालुक्‍यातील ३४ गावांच्या निवडणुका होत आहेत.

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election