पापाच्या तिकटीला ९० वर्षे सुरांची साथ

सुधाकर काशीद
गुरुवार, 21 जून 2018

कोल्हापूर - पापाची तिकटी म्हणजे कोल्हापूरचा तिठ्ठाच. येथे म्हशीचे धारोष्ण दूध मिळते. कोल्हापुरी चप्पल, पान सुपारी, तंबाखू, भाज्यांची रोपे, कपडे यांची तर बाजारपेठच फुलते. नाकातून चरचरीत ढेकर काढणारा बाटलीतला सोडा आजही येथेच मिळतो. 

कोल्हापूर - पापाची तिकटी म्हणजे कोल्हापूरचा तिठ्ठाच. येथे म्हशीचे धारोष्ण दूध मिळते. कोल्हापुरी चप्पल, पान सुपारी, तंबाखू, भाज्यांची रोपे, कपडे यांची तर बाजारपेठच फुलते. नाकातून चरचरीत ढेकर काढणारा बाटलीतला सोडा आजही येथेच मिळतो. 

सूर्यकांत हॉटेलमध्ये तर रांग लावून कांदाभजी खाणारा खवय्या भेटतो. सकाळी सहा ते रात्री बारा असा कायम कलकलाट असलेल्या या तिकटीस फक्त एक अपवाद असतो. कारण या कलकलाटातही तबला, मृदुंगावरची थाप आणि हार्मोनियमचा सूर नेहमी येणार-जाणाऱ्यांच्या कानावर पडत असतो. गेली ९० वर्षे या सुरांनी पापाच्या तिकटीची साथ धरली आहे.  ही सुरांची साथ धरायला कारण ठरले आहे, इथले दिलबहार हार्मोनियम वर्क्‍स. पापाच्या तिकटीच्या मुख्य रस्त्यावरच हे आगळेवेगळे दुकान आपला जम बसवून चालू आहे.

तबला, हार्मोनियम, मृदुंग, दिमडी, डमरू अशा कोणत्याही पारंपरिक वाद्यांचा सूर जरा जरी बिघडला तरी त्याला पुन्हा सुरावर आणण्याची किमया गेली ९० वर्षे या दुकानात चालू आहे. हरवलेले सूरही पापाच्या तिकटीवर सापडतात. अशी आपली ओळख या दुकानाने घट्ट केली आहे.

त्र्यंबकराव जाधव यांनी १९२८ साली हार्मोनियम, तबला, मृदुंग दुरुस्ती व विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्या काळात भजन, कीर्तन संगीत मेळा एवढेच मनोरंजनाचे साधन आणि सारे संगीत पारंपरिक वाद्यांच्या आधारे त्यामुळे या त्र्यंबकराव जाधव यांचे हात सतत कामात. लाकडी खोडावर चामडे चढवणे, त्यांची खोडाभोवती बांधणी करणे, चामड्यावर शाई लावणे, शाई शाळिग्रामच्या साहाय्याने घोटवणे आणि घोटवलेल्या या शाईतून हवे ते सूर उमटवणे हे त्यांचे कौशल्य होते. आणि त्यातून या व्यवसायाचे सूर जुळत गेले. तबल्यावर त्यांनी बोट टेकवले तरी सुरांचे तरंग उमटू लागले.

सुरांच्या तरंगावरून तबला मृदुंगाची पारख करू लागले. काही वर्षांत इलेक्‍ट्रॉनिक्‍स वाद्यांचा जमाना आला. असे वाटू लागले की पारंपरिक वाद्याचे काय होणार ? पण दिलबहार हार्मोनियमचे जाधव बंधू या चिंतेबाहेर होते. त्यांना पारंपरिक वाद्यांच्या सुराबद्दल एवढा विश्वास होता, की हेच सूर चिरंतन राहणार असे ते म्हणत होते आणि घडलेही तसेच. आजही इलेक्‍ट्रॉनिक्‍स वाद्यांनी बाजार फुलला आहे; पण तबला, मृदुंग, हार्मोनियम, दमडी, तुणतुणे, चौंडकं, संबळ या पारंपरिक वाद्यांचा सूर इलेक्‍ट्रॉनिक्‍स गदारोळातही सुखावणारा आहे. म्हणूनच कायम कलकलाट असणाऱ्या पापाच्या तिकटीला गेली ९० वर्षे सुरांची किनार कायम आहे.

चौथी पिढी सुरांच्या सान्निध्यात
त्र्यंबकराव जाधव यांनी ९० वर्षांपूर्वी दिलबहार हार्मोनियम सुरू केले, त्यानंतर धनाजीराव जाधव, अमित जाधव व रोहित जाधव ही चौथी पिढी या सुरांच्या सान्निध्यात आहे. 

Web Title: Kolhapur News Harmonium works in Papachi Tikati