...तर मीच लोकसभा निवडणूक मैदानात ! - मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

गडहिंग्लज - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रा. संजय मंडलिक यांना रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून सुरू असतानाच आज येथे कार्यकर्त्यांच्या गोपनीय बैठकीत खुद्द मुश्रीफ यांनीच कदाचित मलाही लोकसभेच्या रिंगणात उतरावे लागेल, अशी गुगली टाकून खळबळ उडवून दिली आहे.

गडहिंग्लज - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रा. संजय मंडलिक यांना रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून सुरू असतानाच आज येथे कार्यकर्त्यांच्या गोपनीय बैठकीत खुद्द मुश्रीफ यांनीच कदाचित मलाही लोकसभेच्या रिंगणात उतरावे लागेल, अशी गुगली टाकून खळबळ उडवून दिली आहे.

श्री. मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिस्क कंपनीने चालविण्यासाठी घेतलेल्या गोडसाखर कारखान्यात प्रा. मंडलिक यांनी येऊन साखर पोती पूजन केल्याची घटना ताजी असतानाच मुश्रीफ यांच्या या गुगलीने लोकसभा निवडणुकीनिमित्त सुरू असलेले राजकीय वातावरण पुन्हा कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

श्री. मुश्रीफ विविध कार्यक्रमांनिमित्त दौऱ्यावर होते. पक्ष कार्यालयात मतदार नोंदणी मार्गदर्शनासाठी त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी शहर आणि परिसरातील पक्षाच्या वाटचालीसंदर्भात कार्यकर्त्यांना कानपिचक्‍याही दिल्याचे समजते. गेल्या काही निवडणुकीत ठराविक कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी काम केल्याचा मुद्दा काही प्रमुख कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिला. त्यानंतर मुश्रीफ यांनी या विषयात मी स्वत: लक्ष घालणार आहे, असे सांगितल्याचे कळते.

दरम्यान, याच बैठकीत मुश्रीफ यांनी वरील गुगली टाकून खळबळ उडवून दिली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्याशी माझे वैयक्तिक हेवेदावे नाहीत. त्यांनी गेल्या काही वर्षांत पक्षविरोधी काम सुरू केल्याने कार्यकर्त्यांतच नाराजी आहे. दिल्ली, मुंबई आणि कोल्हापूर जिल्हा अशा तिन्ही ठिकाणी महाडिक वेगवेगळ्या भूमिकांत वावरत असल्याचे चित्र आहे, असा टोलाही श्री. मुश्रीफ यांनी लगावल्याचे कळते. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर ‘राष्ट्रवादी’कडून संजय मंडलिक यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, ऐनवेळी त्यांनी नकार दिला तर मलाच लोकसभा निवडणूक रिंगणात उतरावे लागेल. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी मानसिकता तयार करावी, असे सूचक वक्तव्य करून त्यासाठी मतदार नोंदणीत कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करण्याचा सल्लाही दिल्याचे काही कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

दौऱ्यातील राजकीय चिमटे...
साधना शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात श्री. मुश्रीफ व जनता दलाचे नेते ॲड. श्रीपतराव शिंदे एकाच व्यासपीठावर होते. गेल्या महिन्यात पाणी परिषदेच्या निमित्ताने दौऱ्यावर आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री. शिंदे यांच्या घरी स्नेहभोजन घेतले होते. त्याचा संदर्भ घेत श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘आमचे मार्गदर्शक व पुरोगामी विचाराचे ॲड. शिंदे यांच्या घरी पालकमंत्र्यांनी स्नेहभोजन घेतले. शिंदे यांनी कधी तरी आम्हालाही स्नेहभोजनाला बोलवावे.’’ यावर एकच हशा पिकला. त्या वेळी लगेचच, मंत्री पाटील यांनी स्वत:हून स्नेहभोजनासाठी येणार असल्याचा निरोप दिल्याने हा योग घडून आल्याचे नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी स्पष्ट केले. तालुक्‍यातील कडगावमधील कार्यक्रमात मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांनाच ‘टार्गेट’ करीत जाहिराती करून निवडणूक लढविता येत नसल्याचा आरोप करीत समरजितसिंह अजून बच्चा आहे, असा टोला लगावला.

ही बैठक गोपनीय होती. आगामी निवडणुकीसाठी मतदार नोंदणीसंदर्भातही मार्गदर्शन करायचे होते. त्या अनुषंगाने, किमान दहा वर्षे तरी खासदारकीसाठी माझी इच्छा नाही. राज्यातून मला बाहेर जायचे नाही; परंतु परिस्थिती विचारात घेऊन पक्षाने जबाबदारी सोपविली तर लोकसभा निवडणूक रिंगणात मला उतरावे लागेल, इतकीच चर्चा बैठकीत झाली आहे.
- हसन मुश्रीफ,
आमदार

Web Title: Kolhapur News Hasan Mushrif comment