आमचे खासदार भाजप-ताराराणीचे नेते - हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - ‘‘महापालिकेतील स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांची खासदार म्हणून काही भूमिका नाही; पण ते भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीचे नेते आहेत,’’ असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला. 

कोल्हापूर - ‘‘महापालिकेतील स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांची खासदार म्हणून काही भूमिका नाही; पण ते भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीचे नेते आहेत,’’ असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला. 

‘‘श्री. महाडिक हे माझा आदर करतात, माझा सन्मान करतात, ही त्यांची संस्कृती. त्यांच्याशी माझे व्यक्तिगत मतभेद नाहीत, पक्षाच्या बाबतीतील त्यांची भूमिका मला पटत नाही,’’ असेही श्री. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

मुश्रीफ म्हणाले, ‘‘महापालिकेमधील घडामोडींत त्यांचा सहभाग आहे का नाही, हे मला माहीत नाही; पण त्यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हाडाची काडे व रक्ताचे पाणी केले. ते पराभूत झाले, तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. महाराष्ट्रात अशी जबाबदारी कोणत्या मंत्र्यांनी घेतली नव्हती. देशभर मोदींची लाट असताना त्यांना निवडून आणले, त्यासाठी सतेज पाटील यांच्याशी समझोता केला, प्रचाराची धुरा सांभाळली, त्यामुळे ज्या पक्षाने त्यांना खासदार केले, त्या पक्षाशी संबंध बिघडू नयेत एवढाच त्यांनी प्रयत्न करावा.’’

मुश्रीफ म्हणाले, ‘‘लोकसभेनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत ते विरोधात होते. एकदा त्यांनी चुलत्यांचे कारण सांगितले, एकदा मला सर्वपक्षीयांनी मदत केल्याचे सांगितले; पण ज्या वेळी ते जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी भाजप सदस्यांची व्होल्ह्वो चालवायला बसले, त्या वेळी माझ्या संतापाचा कडेलोट झाला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाही हे सर्व माहीत आहे.’’

‘‘‘बिद्री’ कारखान्यातील भाजपसोबतची आघाडी ही समजून-उमजून आणि निवडणुकीपूर्वी झाली होती. भाजपकडून ज्यांना उमेदवारी दिली गेली, ते विठ्ठल खोराटे, बजरंग देसाई, राजे विक्रमसिंह घाटगे गट हे पूर्वीच्या निवडणुकीतही आमच्यासोबतच होते. ‘स्थायी’ निवडीत ज्याप्रमाणे श्री. चव्हाण व श्री. पिरजादे यांनी सौ. मेघा पाटील यांचे खाऊन त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला असे ‘बिद्री’त झाले नाही. सहकारी संस्थांचे राजकारण हे वेगळे असते. इचलकरंजी प्रकरणातही कारवाईसाठी पाठपुरावा सुरू आहे,’’ असे श्री. मुश्रीफ यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 

‘राष्ट्रवादी’त सगळ्यांना आणत असतील
भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना घेऊन खासदार महाडिक हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्याकडे लक्ष वेधले असता ‘‘त्यांनाही श्री. खासदार राष्ट्रवादीत आणत असतील,’’ असा टोला श्री. मुश्रीफ यांनी लगावला. 

नाहीतर मग मीच 
लोकसभेबाबत श्री. पवार एवढ्यात कसे बोलतील? अजून निवडणुकीला अवकाश आहे, खासदार महाडिक यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही, प्रा. संजय मंडलिक यांनी शिवसेनेकडूनच लढणार असे जाहीर केले आहे. मी दिल्लीत जायचे ठरवलेले नाही; पण पक्षाने जबाबदारी दिली तर लोकसभा लढवण्यास मी तयार आहे, असे श्री. मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा सांगितले.

Web Title: Kolhapur News Hasan Mushrif press