शिरोळ तालुक्यात पावसाचा नऊ वर्षांतील उच्चांक

युवराज पाटील
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

दानोळी -  नऊ वर्षांमध्ये पावसाळ्यामध्ये जेवढा पाऊस पडला नाही, त्याच्यापेक्षा अधिक पाऊस या वर्षी पडला आहे. सप्टेंबर व ऑक्‍टोबरमध्ये तब्बल ५०४.७४ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले, तरी या दमदार पावसाने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.

दानोळी -  नऊ वर्षांमध्ये पावसाळ्यामध्ये जेवढा पाऊस पडला नाही, त्याच्यापेक्षा अधिक पाऊस या वर्षी पडला आहे. सप्टेंबर व ऑक्‍टोबरमध्ये तब्बल ५०४.७४ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले, तरी या दमदार पावसाने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.

खरीप पिकांसह भाजीपाला व इतर पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे; मात्र तालुक्‍यातील पाण्याच्या साठ्यामध्ये व भूजलपातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

महापूर म्हटले, की संपूर्ण महाराष्ट्रात शिरोळ तालुक्‍याचे नाव पुढे येते; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणात अत्यल्प पाऊस या तालुक्‍यात पडतो. सरासरी पावसाचे प्रमाण अत्यल्प असूनही कृष्णा, पंचगंगा, वारणा व दूधगंगा अशा चार नद्यांमुळे तालुक्‍याला पुराचा मोठा फटका बसतो. २००५ व २००६ चा पाऊस व पुराच्या फटक्‍यानंतर दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. नऊ वर्षांतील वर्षभराच्या पावसाची सरासरी काढल्यास ती ५०१ मिलिमीटरची आहे. त्याच्यापेक्षा अधिक पाऊस या वर्षी गेल्या दीड महिन्यात परतीच्या पावसात पडला आहे.

यंदा ८७४.२४ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. तर सप्टेंबरशेवटी व ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार तडाखा दिला. नऊ वर्षांतील संपूर्ण पावसाळ्यापेक्षाही या वर्षीच्या परतीच्या पावसाची नोंद अधिक आहे.

हंगामी पावसाने मारले, तर परतीच्या पावसाने तारले
या वर्षी पावसाळ्याची सुरवात चांगली झाली. जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये ३६९.५ मिलिमीटर पाऊस पडला; मात्र परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने पुढील वर्षभर पाण्याची चिंता मिटली आहे.
वंचित असणाऱ्या गावांतही शिरोळ तालुक्‍यातील चिपरी, निमशिरगाव, जैनापूर, तमदलगे, कोंडिग्रे या गावांत दहा ते १२ वर्षांपासून प्रमाणात फारच कमी पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील या पाच गावांमध्ये काही वर्षांपासून दुष्काळसदृश स्थिती आहे. परतीच्या पावसाने या गावांतही दमदार हजेरी लावली. जैनापूर येथे शरद कृषी महाविद्यालयात असणाऱ्या पर्जन्यमापक यंत्रामध्ये सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यात ४३८ मिलिमीटर पावसाची नोंद आहे.

एक हजार मिलिमीटर पाऊस
शिरोळ तालुक्‍यात १९९९ मध्ये १००३ तर २००६ मध्ये ११७५ मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यानंतर यंदा एक हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. 

 

Web Title: Kolhapur News Highest in nine years of rainfall in Shirol taluka