शेट्टी पुन्हा खासदार नसतील - हिंदूराव शेळके

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा खासदार राजू शेट्टी यांनी सर्वप्रथम आमच्या कार्यकर्त्यासोबत हातकणंगले मतदारसंघातून लढावे,’’ असे आव्हान देतानाच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी, ‘‘२०१९ ला श्री. शेट्टी हे खासदार नसतील. आमचाच कार्यकर्ता निवडून येणार,’’ असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

कोल्हापूर -  ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा खासदार राजू शेट्टी यांनी सर्वप्रथम आमच्या कार्यकर्त्यासोबत हातकणंगले मतदारसंघातून लढावे,’’ असे आव्हान देतानाच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी, ‘‘२०१९ ला श्री. शेट्टी हे खासदार नसतील. आमचाच कार्यकर्ता निवडून येणार,’’ असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

दरम्यान ऊस दराच्या माध्यमातून सुरू असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दुकानदारी बंद पडणार या नैराश्‍येतूनच श्री. शेट्टी यांनी पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारवर टीका सुरू केली आहे, असा आरोपही श्री. शेळके यांनी केला. 

ऊस परिषदेत श्री. शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. या टीकेला भाजपच्या वतीने आज प्रत्युत्तर देण्यात आले. श्री. शेळके म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यानंतर जे मिळाले नाही ते गेल्या तीन वर्षांत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले. ७० वर्षांची घाण तीन वर्षांत काढा म्हणाल तर ते शक्‍य नाही. ऊस परिषदेत श्री. शेट्टी यांनी मोदींवर टीका करण्याचे कारण नव्हते. त्यांनी हातकणंगलेतून श्री. मोदी यांना आव्हान देण्यापेक्षा सर्वप्रथम आमच्या कार्यकर्त्याविरोधात लढून दाखवावे. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात दोन आमदार भाजपचे आहेत, माजी मंत्री विनय कोरे हे आमच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांनी २०१९ ला खासदार होऊनच दाखवावे, ते खासदार नसतील.’’

देशात श्री. शेट्टी हे त्यांच्या पक्षाचे एकमेव खासदार, जिल्हा परिषदेत, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यांची वाताहात झाली आहे. त्यांनी मोदींना आव्हान देण्याची भाषा करू नये. आमचीही या मतदारसंघात ताकद आहे. राज्यात भाजपचे ४२ खासदार माझ्यामुळे निवडून आले, असे ते म्हणत असतील तर मग त्यांच्या तालुक्‍यात त्यांची ही स्थिती का?, असा सवालही श्री. शेळके यांनी उपस्थित केला. 

श्री. शेळके म्हणाले, ‘‘ऊस दरावरून संघटनेने कारखान्यांना इशारा दिला असला तरी सरकारने कारखादार व शेतकरी यांना सरंक्षण दिले पाहिजे. या वर्षी एफआरपीच्या दरात वाढ झाली आहे, इतर शेतमालाला हमीभाव देण्यात सरकारला यश आले आहे. ऐतिहासिक कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढे सर्व शेतकऱ्यांसाठी केवळ तीन वर्षात सरकारने केले आहे, असे असताना केवळ आपली दुकानदारी बंद होईल म्हणून सरकारवर आरोप करणे चुकीचे आहे.’ या वेळी भाजप नेते व ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, युवराज पाटील, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

...मग ढोल कशाला वाजवले?
‘‘सरकारची कर्जमाफी फसवी आहे. शेतकरी सन्मान नव्हे तर शेतकरी अपमान योजना असल्याची टीका श्री. शेट्टी करत असले तरी हेच शेट्टी कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर राज्यभर ढोल वाजवत कशाला सत्कार स्वीकारत होते,’’ असा टोलाही श्री. शेळके यांनी लगावला.

... तर तुपकरांना रस्त्यावर फिरू देणार नाही : सुरेशदादा
इचलकरंजी ः ‘‘बहुजन समाजातील नेत्यांना जर रवीकांत तुपकर यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही,’’ असा इशारा महाराष्ट्र राज्य रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला.

जयसिंगपूर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तुपकर यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती. त्याला श्री. पाटील यांनी उत्तर दिले.

तुपकरांना सत्तासुंदरीचा मोह अद्याप सुटलेला नाही. लबाड, ढोंगी असलेले तुपकर महामंडळाच्या सत्तेचा उपभोग घेत आहेत. मुंबईतील मलबार हिल येथील सरकारी बंगला त्यांनी अद्याप सोडलेला नाही. ते सत्तेला चिकटून आहेत. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी वस्त्रोद्योगासाठी कोणते धोरण राबविले, हे सगळ्यांना माहित आहे.

महामंडळ गेले तेव्हा कृषी मंत्र्यांकडे त्यांना यावे लागले. तुपकरांची नौटंकी सत्तेसाठी सुरू आहे. विधानपरिषदेची आमदारकी मिळते का यासाठी त्यांची उचापत सुरू आहेत. सत्ता नकोच होती, शेतकऱ्यांसाठी काम करायचे होते तर महामंडळ घेतलं कशाला? बंगला, पोलिस संरक्षण असे सत्तेचे सुख ते घेत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीला साधा एक उमेदवार उभा करता आला नाही आणि मंत्री खोत यांच्यावर टीका करत आहेत. तुपकर यांनी यापूर्वी कोणते उद्योग केलेत ते पाहा. तोंड उघडायला लावू नका,’’ असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Kolhapur News Hindurao Shelake press