बेकायदा गुटखा उत्पादन प्रकरणी जमादार पिता-पुत्रांना ३५७ कोटींची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मिरज - बेकायदा गुटखा उत्पादन करून सरकारचा कोट्यवधी रुपयांचा अबकारी कर बुडवणाऱ्या मुसा जमादार, त्याचे दोन मुलगे फारुक आणि फिरोज या सर्वांना आज केंद्रीय उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी ३५७ कोटी रुपये भरण्याची नोटीस दिली.

मिरज - बेकायदा गुटखा उत्पादन करून सरकारचा कोट्यवधी रुपयांचा अबकारी कर बुडवणाऱ्या मुसा जमादार, त्याचे दोन मुलगे फारुक आणि फिरोज या सर्वांना आज केंद्रीय उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी ३५७ कोटी रुपये भरण्याची नोटीस दिली.

मुसा सध्या कळंबा कारागृहात असल्याने त्याच्या नोटिशीची अंमलबजावणी करण्यात आली. फारुक आणि फिरोजला त्याच्या निवासस्थानी नोटिसा बजावण्यात आल्या. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या अबकारी कराची वसुली कारवाई करण्यात येत आहे. 

शहरापासून जवळच असलेल्या आरग- मगंसुळी  रस्त्यावर केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने ७ फेब्रुवारी २०१७ रोजी पहाटे मुसा जमादार याच्या बेकायदा गुटखा कारखान्यावर केंद्रीय उत्पादन शुल्कच्या विशेष पथकाने छापा टाकला. तेथून सव्वा दोन कोटी रुपयांचे साहित्य जप्त केले. कारखान्यातील १६ कर्मचाऱ्यांसह एका सूत्रधारास ताब्यात घेतले. 

कारखान्याचा मालक म्हणून फिरोज जमादार आणि व्यवस्थापक शिशुपाल कांबळेला अटक केली. त्यानंतर कारखान्याचा मुख्य म्हणून मुसा जमादार आणि त्याचा मुलगा फारुक मुसा जमादारचीही नावे निष्पन्न झाली. कारवाई पथकाच्या प्रमुख आणि केंद्रीय उत्पादन शुल्कच्या उपनिदेशक वैशाली पतंगे यांनी गुटखा तस्करीच्या रॅकेटचा तपास केला. यामध्ये कर्नाटक, गुजरातसह अनेक ठिकाणी धाडी टाकून पथकाने यातील अनेकांना अटक केली. त्यांच्याकडूनही चुकवलेल्या अबकारी कराच्या वसुलीची कारवाई सुरू केली आहे.

केंद्रीय उत्पादन शुल्कच्या पुणे येथील सूचना महानिदेशालय विभागाकडून गेल्या वर्षभरापासून कारवाईबाबत मार्गदर्शन आहे. कारखान्याचा मालक म्हणून फिरोज जमादारच्या घरातून जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये हा कारखाना किमान गेल्या तीन  वर्षांपासून सुरू असल्याचे दिसून आले. केंद्रीय उत्पादन शुल्कच्या नियमाप्रमाणे ३५७ कोटी रुपयांचा उत्पादन शुल्क कर चुकवण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे आजवरच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

याच कारवाई दरम्यान केंद्रीय उत्पादनच्या विशेष पथकाने मिरज शहरासह, इचलकरंजी, निपाणी, गुजरातमध्ये वापी या ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्येही गुटखा निर्मिती आणि त्यानतंरच्या विक्रीमध्ये गुंतलेल्या व्यावसायिकांविरुद्धही चुकवलेल्या अबकारी कराच्या वसुलीसाठी अशाच प्रकारची कारवाईचे संकेत केंद्रीय उत्पादनच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहेत. कारवाईवेळी याच पथकाने तब्बल दहा ठिकाणी धाडी टाकून तस्करीची पाळेमुळेच उखडून काढली होती.

Web Title: Kolhapur News Illegal Gutaka Production issue