बेकायदा वृक्षतोडीची दंडावर बोळवण

बेकायदा वृक्षतोडीची दंडावर बोळवण

पोंबरेतील प्रकरण - २६८ झाडे तोडूनही २६ हजार ८०० रुपयांवर तोडपाणी

कोल्हापूर - मौजे पोंबरे (ता. पन्हाळा) येथे खासगी मिळकतीवरील ७०० वर झाडांची विनापरवाना कत्तल झाली. त्याची रीतसर तक्रार वनविभागाकडे आल्यानंतर वनविभागाने केवळ २६८ झाडे तोडल्याची नोंद केली. त्यासाठी २६ हजार रुपयांचा दंड केला, तसेच ज्यांनी झाडे तोडली त्यांनाच लाकडे देऊन प्रकरण मिटवल्याचे समोर आले आहे.  

पोंबरे येथील सरकारी मुलकी पडजमीन आहे. ही मिळकत त्याच गावातील एका घराण्याकडे आहे. त्यात जमिनीत अनेक हिस्सेदार आहेत. यातील एका हिस्सेदाराच्या वाटणीच्या जागेत गेल्या दोन महिन्यांत जवळपास ७०० वर झाडे तोडल्याची तक्रार पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकाऱ्यांकडे आली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यात सुरवातीला शंभर झाडे तोडल्याचे दाखविले. यानंतर तक्रारदाराने जागेवर पाचशेपेक्षा अधिक झाडे असल्याचा पुरावा देण्याची तयारी दर्शविताच अंतिम पंचनाम्यात २६८ झाडे तोडल्याचे दाखविले. 

यासाठी २६ हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला. शासकीय नियमानुसार इथंपर्यंताचा प्रकार तांत्रिकदृष्ट्या योग्य मानला तरी एका झाडाला केवळ शंभर रुपयेच दंड कसा, असा प्रश्‍न या भागात विचारला जात आहे. मुळात विनापरवाना झाडे तोडली तर केवळ दंडावर भागवणे हे विशिष्ट प्रकरणात ठीक आहे, मात्र पूर्णवाढ झालेली शेकडो झाडे खुलेआम तोडूनही गुन्हा दाखल करण्याची कोणतीच कारवाई झालेली नाही. यातून कोणी उठून कितीही झाडे विना परवाना तोडावीत आणि फक्त दंड भरून सुटका करून घ्यावी काय, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

यावर कहर म्हणजे ज्यांनी झाडे तोडली त्यांना दंड भरल्यानंतर तोडलेल्या झाडांची लाकडे पंचनामा झाल्यानंतर तोडलेल्या व्यक्तीला दिली गेली. यावरून संगनमताने कारवाईचा केवळ फार्स केल्याची शंका येत आहे.

एकीकडे वृक्ष लागवड, दुसरीकडे तोड 
वनविभागाच्या सहयोगाने शतकोटी वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला. जवळपास साडेआठ लाख झाडे लावली गेली. याच काळात एकीकडे झाडे लावा, वाढवा, असा संदेश वनविभागाने दिला. या उलट कारभार पन्हाळा वनपरिक्षेत्रात घडत होता. विनापरवाना शेकडो झाडाची तोड होत होती. जुजबी दंड भरून सगळेच प्रकरण मिटवले जात होते, असा विरोधाभास कसा, याची चर्चा या भागात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com