मानसिक रुग्णांची संख्या वाढतेय

सदानंद पाटील
शुक्रवार, 1 जून 2018

वर्षभरात जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालयात किमान ३० ते ३५ हजार मनोरुग्णांवर उपचार होत आहेत. मनोरुग्णांची वाढत चाललेली संख्या पाहता या आजारासाठी अभियान राबविण्याची गरज भासू लागली आहे. 

कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या चार-पाच वर्षांत मानसिक रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कधी पालकांच्या अपेक्षांचे ओझे तर कधी कर्जबाजारीपणा हे यातील महत्त्वाचे कारण ठरत आहे. नोकरीत असणाऱ्यांना सतत कामाच्या दबावाने तर नोकरी नसणाऱ्यांमध्ये बेरोजगारीमुळे डिप्रेशन येत आहे. वर्षभरात जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालयात किमान ३० ते ३५ हजार मनोरुग्णांवर उपचार होत आहेत. मनोरुग्णांची वाढत चाललेली संख्या पाहता या आजारासाठी अभियान राबविण्याची गरज भासू लागली आहे. 

मानसिक आजाराने देशभरात १०० मधील सहा व्यक्‍ती त्रस्त असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. या आजाराचे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमाणही वाढत आहे. त्यातही १५ ते ३० वयोगटात मानसिक आरोग्य बिघडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. दहावी-बारावी परीक्षांचा निकाल लागला, की नैराश्‍य आणि दबावामुळे विद्यार्थ्यांत मनोरुग्णांचे प्रमाण वाढल्याचे आढळून येते.

जिल्ह्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसोपचार विभागात दरवर्षी १३ ते १४ हजार मनोरुग्णांवर उपचार केले जातात. ही संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यात मनोरुग्णांवर उपचार करणारी ही एकमेव शासकीय संस्था आहे. जिल्ह्यातून मिरज व रत्नागिरी येथे उपचारासाठी जाणारे रुग्णही आता येथे येत आहेत. तसेच जिल्ह्यात २५ पेक्षा अधिक मानसोपचार तज्ज्ञही कार्य करत आहेत.

एक नजर

वर्ष                           रुग्णांची संख्या (वैद्यकीय महाविद्यालय)
२०१५                                 १०८३६
२०१६                                 १३१७१
२०१७                                  १४३१६
२०१६(जानेवारी ते एप्रिल ४ महिने)     ६५२६

चार-पाच वर्षांत डिप्रेशनमध्ये गेलेल्या रुग्णांची वाढलेली संख्या चिंताजनक आहे. अलीकडे कुटुंब, कार्यालय अशा सर्वच ठिकाणी मोकळेपणाने संवाद होत नाही. सोशल मीडियाने यात भर घातली आहे. कामाशिवाय तासन्‌तास मोबाईलचा वापर होतो. आर्थिक चणचण, कर्ज, व्यसनाधीनता, पालकांच्या वाढत्या अपेक्षा आदी कारणांमुळेही मनोरुग्णांची संख्या वाढत आहे.
- डॉ. पवन खोत,
विभागप्रमुख, मानसोपचार विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Web Title: Kolhapur News Increasing number of mental patients