‘आयआरबी’च्या कृपेने शहर तुंबले

‘आयआरबी’च्या कृपेने शहर तुंबले

कोल्हापूर - पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यालगत आयआरबी कंपनीने फूटपाथखाली बांधलेली गटारे नावालाच आहेत. ४९ किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेल्या या गटारीतून पाणीच वाहून जात नाही. अनेक ठिकाणी गटारे अर्धवट अवस्थेतच आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी रस्त्यावर साचून राहते; परिणामी रस्त्याला तळ्याचे स्वरूप येत आहे. डांबरी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्तेही खराब होत आहेत. आयआरबी कंपनी काम करून कोल्हापुरातून निघून गेली; पण कोल्हापूरकरांच्या वाट्याला हे कायमचे दुखणे लागले आहे. धड पाणीही वाहून जात नाही अन्‌ साफही करता येत नाहीत. अशा गटारी म्हणजे शहरवासीयांची डोकेदुखी बनली आहे.

कोल्हापुरात २००९ मध्ये ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’, या तत्त्वानुसार शहर रस्ते विकास प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पातून शहरात प्रवेश करणारे ४९ किलोमीटर लांबीचे १३ रस्ते बांधण्याच्या कामास सुरवात झाली. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाळ्यात पाणी वाहून नेणाऱ्या गटारी बांधण्यात आल्या. या गटारींवर फूटपाथही बनविण्यात आले आहेत. या गटारींतील घाण, गाळ काढण्यासाठी प्रत्येक पन्नास फुटांवर चेंबर ठेवण्यात आली आहेत. नियोजनाप्रमाणे या गटारींचे काम झालेले नाही. या गटारींच्या कामात अनेक ठिकाणी अडथळे येत राहिले. त्यामुळे गटारींची कामे आजही अर्धवट अवस्थेतच आहेत. या गटारी मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या इतर गटारी अथवा मोठ्या चॅनेलला जोडणे गरजेचे होते. तसे कोठेच झालेले दिसत नाही. त्यामुळे या गटारींतून पाणी वाहून नेले जात नाही. रस्त्यावरचे सर्व पाणी रस्त्यावरच साचून राहत असल्याने पावसाळ्यात दैना उडाली आहे. आयआरबी कंपनीने केलेल्या मुख्य रस्त्यामध्ये तावडे हॉटेल ते शिवाजी पूल, शिये नाका एसपी ऑफिस ते शाहू नाका, राजाराम कॉलेज ते बागल चौक, रेल्वे फाटक उड्डाणपूल ते उमा टॉकीज, हॉकी स्टेडियम ते टायटन शोरुम सायबर चौक, आयसोलेशन हॉस्पिटल ते इंदिरासागर हॉल, कळंबा नाका ते इंदिरासागर हॉल, कावळा नाका ते धैर्यप्रसाद मंगल कार्यालय, दसरा चौक, खानविलकर पंप ते पोलिस लाईन, चिमासाहेब चौक ते कसबा बावडा आदी रस्ते या प्रकल्पातून करण्यात आले. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी गटारी बांधण्यात आल्या आहेत. या गटारी नावालाच आहेत. अनेक ठिकाणी ही कामे अपुऱ्या अवस्थेत आहेत, त्यामुळे पाणी रस्त्यावरच येत आहे.

या गटारी काढायच्या कशा?
आयआरबी कंपनीने तयार केलेल्या गटारी स्वच्छ करताना महापालिकेच्या सफाई कामगारांना अडचणी येतात. कर्मचाऱ्यांना त्या चेंबरमध्ये उभे राहून गटारीत खोरे घालता येत नाही. गटारीतील गाळ, घाण साफ होत नाही परिणामी गटारीत पाणी तुंबूनच राहते. या गटारीच काढता येत नसल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com