आयएसओ मिळाले; पण...

सुधाकर काशीद
मंगळवार, 8 मे 2018

कोल्हापूर - पोलिस ठाणी चकाचक होत आहेत. खाकीची परंपरागत धूळ झटकून नव्याने उभी राहत आहेत. एवढेच काय, आयएसओ प्रमाणपत्राने पोलिस ठाणी गौरवली जात आहेत. एक चांगल्या बदलाची ही नक्‍कीच सुरुवात आहे; पण या चकचकीत पोलिस ठाण्यातल्या पोलिसांची मानसिकता आणि पोलिसांवरील ताण याचेही मूल्यमापन करण्याची तरतूद आयएसओच्या निकषात असण्याची गरज आहे.

कोल्हापूर - पोलिस ठाणी चकाचक होत आहेत. खाकीची परंपरागत धूळ झटकून नव्याने उभी राहत आहेत. एवढेच काय, आयएसओ प्रमाणपत्राने पोलिस ठाणी गौरवली जात आहेत. एक चांगल्या बदलाची ही नक्‍कीच सुरुवात आहे; पण या चकचकीत पोलिस ठाण्यातल्या पोलिसांची मानसिकता आणि पोलिसांवरील ताण याचेही मूल्यमापन करण्याची तरतूद आयएसओच्या निकषात असण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील एका पाठोपाठ एक पोलिस ठाणी आयएसओच्या यादीत येत आहेत. पण या ठाण्याच्या हद्दीतील अवैद्य व्यवसाय व काही पोलिस कर्मचाऱ्यांची मग्रुरी याचा विचार आयएसओ मानांकन देणाऱ्या यंत्रणेने केला का? आणि सध्याच्या व्यवस्थेत खरोखरच पोलिसाला त्याच्या कामाचे समाधान मिळेल, असे वातावरण सर्वच ठाण्यात आहे का? हेच आयएसओ देणाऱ्या यंत्रणेने प्राधान्याचे पाहण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया पोलिसांतून व्यक्‍त होत आहे. 

काल रात्री साध्या कारणावरून पोलिसांनी एसटी स्थानकाजवळ एका तरुणाला ठोकले. काळे धंदे बंद करणार, अशी शंभर वेळा घोषणा होऊनही मटका सगळीकडे ओपन आहे. सकाळपासून राबराब राबणारे बहुतेक पोलिस बंदोबस्त, पंचनामे, व्हीआयपी दौरे यात अक्षरश: गुरफटून गेले आहेत. त्यामुळे आयएसओ प्रमाणपत्र, चकाचक इमारतीला, त्यातल्या फाईलींच्या गठ्ठ्यांना की तिथल्या लोकाभिमुख वातावरणाला हे एकदा स्पष्ट होण्याची गरज आहे. एका बाजूला काळे धंदे, गुंडगिरी चालू असताना दुसऱ्या बाजूला ठाण्यांना आयएसओ प्रमाणपत्र हा सहजपणे नागरिकांच्या मनात येणारा प्रश्‍न आहे. 

पोलिस यंत्रणा लोकांसाठी हे खरे आहे. पण पोलिसांची सध्याची कार्यपद्धतीही आयएसओ निरीक्षणात नोंदवण्याची गरज आहे. पोलिसाला आठ तास ड्युटी ही घोषणा आता एक विनोद म्हणून पोलिस त्याकडे पाहत आहेत. पोलिस म्हटल्यावर त्याला २४ तास ड्युटी करावी लागणार हे खरे आहे. पण आता पोलिस किती राबतो याला प्रमाणच नाही, अशी परिस्थिती आहे. हातातले काम आजच्या आज पूर्ण करतो, असे पोलिस म्हणू शकत नाहीत. कारण हातातले काम टाकून त्याला कधी कोठे पळावे लागेल याची खात्री नाही आणि काही वरिष्ठांची पोलिस कॉन्स्टेबलशी बोलण्याची भाषा बघितली तर तो पोलिस कधीही मानसिक समाधानी राहू शकत नाही, अशी परिस्थिती आहे.

याशिवाय आता जनता इतकी जागरूक झाली आहे की, पोलिसांकडून जरा काही वावगे झाले तर तक्रार केल्याशिवाय राहत नाही. या परिस्थितीत ज्या वास्तूतला पोलिस समाधानी आहे, जनता समाधानी आहे, त्या वास्तूलाच आयएसओ देण्याची गरज आहे. 

हद्दीत कोठे काळे धंदे असतील तर ते कळवण्यासाठी व्हॉटस्‌अप ग्रुप केला आहे. माहिती कळताच कारवाई करतो. आयएसओला धक्‍का पोहोचेल, असा कारभार न करण्याची नक्‍कीच खबरदारी घेतली आहे. 
- संदीप भागवत, पोलिस निरीक्षक, गगनबावडा

आयएसओमुळे ठाण्याची जबाबदारी वाढली आहे. एखाद्या नागरिकाने साधी तक्रार केली तर त्याची विशिष्ट वेळेतच दखल घ्यावी लागते, तशा पद्धतीनेच पन्हाळा पोलिस ठाण्याचे काम चालू आहे. 
- रवी साळोखे, पोलिस निरीक्षक, पन्हाळा

राजारामपुरी पोलिस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाले; पण तेथे गुंडगिरी धगधगती आहे. मात्र या साऱ्या परिस्थितीचा अभ्यास केला आहे. जे गुन्हेगारीत आहेत, त्यांच्यापेक्षा त्यांना पडद्याआडून पाठबळ देण्याऱ्यांच्याच मुसक्‍या आवळल्या जातील, आयएसओ म्हणजे फक्‍त पोलिस ठाण्याची इमारत असे मानत नाही तर सारी हद्द पोलिसांच्या कायम निगराणीखाली असेल.
- शहाजी निकम, सहायक पोलिस निरीक्षक, राजारामपुरी

आयएसओ मानांकन मिळणे चांगले आहे. पण त्याचा दर्जा टिकवणे ही मोठी जबाबदारी आहे. आयएसओ देणाऱ्यांची आमच्यावर नक्‍कीच नजर असते. आम्ही आयएसओला पात्र असे काम केले नाही, तर मानांकन जाऊ शकते. पण तशी वेळ कधीच येणार नाही.
- मंगेश देसाई, सहायक पोलिस निरीक्षक, कळे 

आयएसओ मानांकन हे फक्‍त ठाण्याच्या इमारतीपुरते नाही याची आम्हाला जाणीव आहेच. अवैध व्यवसायावर निर्बंध, वाईट प्रवृत्तीच्या व्यक्‍तींवर कारवाई, अपघात प्रतिबंधक योजना हे आमचेच काम चालू आहे. आयएसओमुळे त्यात आणखी भर पडेल. 
- सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक, गांधीनगर

आयएसओ मानांकन हे एखाद्या पोलिस ठाण्यासाठी जसे असते, त्याहीपेक्षा ते नागरिकांच्या सोयीसाठी अधिक पूरक ठरते. पोलिस ठाणे म्हणजे उद्धट वागणूक ही प्रतिमा आयएसओमुळे नक्कीच बदलेल.
- आर. आर. पाटील, पोलिस उपअधीक्षक, शाहूवाडी विभाग

आयएसओ हे जरूर प्रमाणपत्र आहे. पण ती मोठी जबाबदारी आहे. त्याचा चांगला परिणाम पोलिसांच्या प्रत्येक कृतीतून दिसेल..
- सूरज गुरव, पोलिस उपअधीक्षक,करवीर

माझ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘काळा धंदा कळवा आणि बक्षीस मिळवा’ असेच माझे आवाहन आहे. आयएसओ मानांकन मिळाले म्हणून नव्हे तर एक कर्तव्यदक्ष पोलिस म्हणून अशीच भूमिका आहे.
- रिझवाना नदाफ, सहायक पोलिस निरीक्षक, नेसरी
 

Web Title: Kolhapur News ISO Police station issue