जरगनगरातील खून प्रकरणी संशयितास अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

कोल्हापूर - जरगनगरमध्ये काल (ता. २०) रात्री प्रतीक ऊर्फ चिंटू पोवारचा डोक्‍यात गोळ्या झाडून खून करून पळालेला संशयित प्रतीक सुहास सरनाईक (वय २९, रा. साई कॉलनी, पाचगाव) याला गावठी पिस्तूलसह गांधीनगर पोलिसांनी अटक केली.

कोल्हापूर - जरगनगरमध्ये काल (ता. २०) रात्री प्रतीक ऊर्फ चिंटू पोवारचा डोक्‍यात गोळ्या झाडून खून करून पळालेला संशयित प्रतीक सुहास सरनाईक (वय २९, रा. साई कॉलनी, पाचगाव) याला गावठी पिस्तूलसह गांधीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे तीन जीवंत काडतुसेही सापडली. महामार्गावरील उचगाव पुलाजवळ सरनाईकला पकडण्यात आले. तो कोल्हापूरहून पुण्याला जाण्याच्या प्रयत्नात होता.

गांधीनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी - प्रतीक पोवारला काल रात्री प्रतीक सरनाईकने पूर्ववैमनस्यातून डोक्‍यात गोळी घातली. त्यानंतर त्याने गावठी पिस्तूलला धाक दाखवून तेथून सागर कांबळेला दुचाकीवरून घेऊन गेला. रात्री तो शहरातून फिरला. रात्री उशिरा त्याने मोटारसायकल शहरातील आत्याकडे ठेवली. घटनेवेळी अंगावर असलेले कपडेही बदलले. त्यानंतर निळा ट्राऊझर व पिवळा टी शर्ट घालून तो नातेवाइकांच्या घरातून बाहेर पडला. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने बस, मोटारसायकल किंवा अन्य कोणत्याही वाहनाचा वापर केला नाही. गांधीनगर पोलिसांनी महामार्गावर साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढविली. आज सायंकाळी प्रतीक सरनाईक चालत उचगाव पुलाजवळ पोचला.

महामार्गावरून जाणाऱ्या वाहनातून पळून जाण्याच्या तयारीत तो होता. याची माहिती गांधीनगर पोलिसांना मिळाली आणि त्यांनी उचगाव पुलाजवळून प्रतीकला ताब्यात घेतले. गांधीनगर, करवीर पोलिस उपाधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, डी. बी. पथकाचे मोहन गवळी, अमित सुळगावकर, राजू भोसले, नारायण गावडे व राकेश माने यांनी ही कारवाई केली. 

पळून जाण्याचा प्रयत्न
गांधीनगर पोलिसांनी साध्या वेशातच प्रतीक सरनाईकला पकडले. त्या वेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. सरनाईक पूर्वी पुण्याला नोकरी करीत होता. तेथे त्याचे मित्र आहेत. त्यामुळे तो पुण्याकडे पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता.

‘फेसबुक’वर बनावट पोस्ट आणि प्रतीक
प्रतीक पोवारने फेसबुकवर तुमचा मृत्यू कसा होईल, या पोस्टच्या आधारे मृत्यूचे कारण पाहिले होते. त्यात ‘मर्डर’ असे संकेत दिले होते, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. अर्थात, फेसबुकवरील अशा पोस्टमध्ये कोणतेही तथ्य नसते. त्याला कसलाही आधार नसतो. केवळ लोकांना वेगळे काही काल्पनिक सांगण्यासाठी किंवा गूढ निर्माण करण्यासाठी अशा पोस्ट फिरत असतात. भविष्यात तुम्ही कसे दिसाल हे पाहतात त्याच पद्धतीने हे आहे. या पोस्टबाबतही पाचगावात चर्चा होती.

गावठी पिस्तूल पिशवीत ठेवले
गोळ्या झाडताना संशयिताच्या अंगावर असलेले कपडे एका पिशवीत घातले. त्याच्या खाली त्याने गुन्ह्यासाठी वापरलेली पिस्तूल ठेवली. प्रतीकला ताब्यात घेतल्यावर गावठी पिस्तूलसह त्याचे कपडेही पोलिसांनी जप्त केले.

Web Title: Kolhapur News Jaragnagar Murder case suspected arrested