जोतिबा चैत्र यात्रेची तयारी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, शासकीय यंत्रणेने डोंगरावरच तळ ठोकला आहे. मुख्य यात्रा जरी शनिवारी असली तरी बेळगाव, बीड, सोलापूर, करवंटी, लातूर, उस्मानाबाद, परळी, घाटनांदूर या दूरवरच्या भाविकांनी डोंगरावर आतापासूनच हजेरी लावली आहे.

जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, शासकीय यंत्रणेने डोंगरावरच तळ ठोकला आहे. मुख्य यात्रा जरी शनिवारी असली तरी बेळगाव, बीड, सोलापूर, करवंटी, लातूर, उस्मानाबाद, परळी, घाटनांदूर या दूरवरच्या भाविकांनी डोंगरावर आतापासूनच हजेरी लावली आहे. बिगरमानाच्या सासनकाठ्यांसह भाविक येऊ लागले आहेत. त्यामुळे डोंगरावर गर्दी होऊ लागली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, ग्रुप ग्रामपंचायत, पुजारी, ग्रामस्थ, सर्व शासकीय यंत्रणा, पोलिस दल यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत. यंदा गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे सुटीचे दिवस आल्याने चैत्र यात्रेत गर्दीचा उच्चांक होण्याची शक्‍यता आहे. पोलिस यंत्रणेनेही डोंगरावरील सर्व कानेकोपरे पिंजून जय्यत तयारी केली आहे. यंदा कोल्हापुरातील पंचगंगा पूल हा अवजड वाहनांसाठी बंद ठेवल्याने दूरवरच्या भाविकांनी आपली वाहने शिये फाटा, टोप फाटा-सादळे मादळे, वारणानगर, वाघबीळ घाटातून डोंगरावर आणावीत, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केले. 

डोंगरावर खोबरेवाटी उधळण्यास बंदी असून, व्यापारी दुकानदार यांनी खोबरेवाटीचे तुकडे करून ते विक्रीसाठी ठेवावेत. दुकानदार खोबरेवाटी विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चोबे यांनी सांगितले. त्यांनी आज डोंगरावरील अनेक दुकानांत जाऊन खोबरेवाटीची पाहणी करत दुकानदारांना सूचना केल्या. डोंगरावर प्लास्टिक बंदी असून, भाविकांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले. 

यंदा सासनकाठीचे मार्ग बदलले आहेत. सर्व सासनकाठ्या शासकीय विश्रामगृहामार्गे पाण्याची टाकी, नवीन वसाहतमार्गे अर्धा शिवाजी पुतळा व दक्षिण दरवाजातून आत येतील. बाहेर पडताना त्या ठाकरे-मिटके गल्लीतून बाहेर पडतील. फक्त मानाच्या सासनकाठ्यांना मंदिरात प्रवेश आहे. ग्रामपंचायतीने गायमुख तलावात १ कोटी लिटर पाण्याचा साठा केला असून, तो सर्व यात्रेस पुरेल इतका आहे. पाईपलाईन-वीज पंपाची देखभाल दुरुस्ती करून सर्व पिण्याचे पाणी शुद्ध केले आहे. डोंगराजवळील गावांतील विहिरी, बोअर यांचे पाणी शुद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

देवस्थान समितीने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर व परिसरात २८ सी.सी. टीव्ही कॅमेरे, दोन डोअर फ्रेम मेटल डिटेक्‍टर यांची व्यवस्था असून, पोलिस यंत्रणेस मदत व्हावी म्हणून १५० सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. 

शासकीय पूजेचा मान 
मुख्य यात्रेदिवशी मंदिरात शासकीय पूजेचा मान यंदा पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र सुखदेव चोबे यांचा असून, त्यांचे गाव शिरसाव, (ता. परंडा, जि. उस्मानाबाद) असून, त्यांचे कुलदैवत श्री जोतिबा आहे. तीन वर्षांपासून ते पन्हाळ्याचे तहसीलदार म्हणून काम पाहतात. सलग तीन वर्षे शासकीय पूजेचा मान मिळणारे श्री. चोबे पहिले अधिकारी आहेत. 

मानाच्या काठ्यांचे प्रस्थान 
जोतिबा चैत्र यात्रेसाठी आज पाडळी (निमाम) ता. सातारा, विहे (ता सातारा), किवळ (ता. कराड) या मानाच्या सासनकाठ्या सवाद्य मिरवणुकीने त्या त्या गावांतून बाहेर पडल्या. शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी डोंगरावर त्यांचे आगमन होईल.

भाविकांचे पाय भाजणार नाहीत 
यंदा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मुख्य मंदिर परिसरात प्रदक्षिणा मार्गावर ‘कूल कोट’ लावल्याने भाविकांचे पाय भाजणार नाहीत. त्यांचे संरक्षण होणार आहे.

Web Title: Kolhapur News Jotiba Chaitra Yatra