कोल्हापुरात मार्चमध्ये रंगणार घोडेस्वारीचा ‘जंपिंग शो’

सुधाकर काशीद
बुधवार, 31 जानेवारी 2018

कोल्हापूर - देशात आलेली कोणतीही नवी मोटार, मोटारसायकल कोल्हापुरात रस्त्यावर दिसणार हे खरे असले, तरीही याच कोल्हापुरात आजही रोज तीन-चारशे जण घोडेस्वारीचा ऐटदारपणा जपत आहेत आणि अशाच घोडेस्वारीत रमलेल्या शौकिनांमुळे देशभरातले नामवंत घोडे व त्या घोड्यावर स्वार होऊन कसरती (जंपिंग) करणाऱ्यांचे कौशल्य कोल्हापूरकरांना पहावयास मिळणार आहे.

कोल्हापूर - देशात आलेली कोणतीही नवी मोटार, मोटारसायकल कोल्हापुरात रस्त्यावर दिसणार हे खरे असले, तरीही याच कोल्हापुरात आजही रोज तीन-चारशे जण घोडेस्वारीचा ऐटदारपणा जपत आहेत आणि अशाच घोडेस्वारीत रमलेल्या शौकिनांमुळे देशभरातले नामवंत घोडे व त्या घोड्यावर स्वार होऊन कसरती (जंपिंग) करणाऱ्यांचे कौशल्य कोल्हापूरकरांना पहावयास मिळणार आहे.

दमदार घोडेस्वारी, घोड्यावरून पोलोचा खेळ, घोड्यावरून डुकराची शिकार (पिग स्टिकिंग), शर्यतीच्या घोड्यांची जपणूक (सोनतळी), रेसकोर्स मैदान, अशी परंपरा असलेल्या कोल्हापुरात प्रथमच हा घोड्यांचा ‘जंपिंग शो’ होणार आहे. कोल्हापूर इक्वेस्टेटिन असोसिएशनने येत्या ३ व ४ मार्च रोजी त्याचे आयोजन केले आहे. एका साहसी पारंपरिक खेळाचे या निमित्ताने कोल्हापुरात पुनरुज्जीवन होणार आहे.

हॉर्स जंपिंग म्हणजे काय?
हॉर्स जंपिंग म्हणजे तशी घोडा आणि घोडेस्वाराची अडथळ्याची शर्यत. ठराविक वेगाने घोडा पुढे न्यायचा व समोर असलेल्या अडथळ्यावरून जंप घेऊन मार्गाक्रण करायचा, हा क्रीडा प्रकार ज्याची घोड्यावर पक्की मांड आहे त्यांनाच जमतो. ज्याचा रोज घोडेस्वारीचा सराव तोच हा खेळ खेळू शकतो.

संस्थांनी वारशामुळे कोल्हापुरात घोडेस्वारीची परंपरा आहे. कोल्हापुरातले पोलिसही घोड्यावरून बंदोबस्त करत होते. कोल्हापुरात आजही घोड्याची पागा म्हणजे घोड्यांची निगा व तळ असलेली जुनी ठिकाणे आहेत. सीपीआरची पिछाडीची बाजू, भवानी मंडप पागा बिल्डिंग, नवीन राजवाडा, पोलिस लाईन या ठिकाणी घोड्याच्या पागा होत्या. याशिवाय आजही जातिवंत घोडे पाळणारे व रोज घोडेस्वारी करणारेही अनेकजण  कोल्हापुरात आहेत. या पार्श्‍वभूमीवर हॉर्स जंपिंग या क्रीडा प्रकाराशी संबंधित असलेल्या कोल्हापूर इक्वेस्टेटिन असोसिएशनतर्फे देशभरातल्या नामवंत हॉर्स जंपिंगपटूंना स्पर्धेसाठी निमंत्रित केले. 

स्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापुरातील अश्‍व शौकिनांच्या इतिहासाला उजाळा मिळणार आहे. त्याचबरोबर नव्या पिढीपर्यंतही हा साहसी खेळ पोहोचणार आहे. नामवंत अश्‍वपटू या स्पर्धेत येतीलच; पण कोल्हापुरातील आठ शाळांतील मुले-मुलीही या स्पर्धेत आपली कामगिरी दाखवतील. स्पर्धेसाठी सर्व घटकांशी संपर्क ठेवण्याचे काम चालू आहे. असोसिएशनचे सर्व सदस्य त्यासाठी राबत आहेत.
-अच्युत कारंडे, 

संयोजक, कोल्हापूर इक्वेस्टेटिन असोसिएशन.

अर्थात हा पूर्वतयारीचा भाग आहे. कोल्हापुरातील आठ शाळांतही अश्‍वारोहण शिकवले जात आहे. त्यामुळे बारा-तेरा वर्षांची मुलेही अश्‍वारोहणात तयार होत आहेत.

नवीन राजवाडा येथील पोलो मैदानावर ही शाही स्पर्धा होणार असून कोल्हापूर इक्वेस्टेटिन असोसिएशनने नामवंत अश्‍वारोहणपटूंना निमंत्रित केले आहे. ज्या पोलो मैदानावर संस्थानकाळात घोड्यावरून पोलोचा थरार रंगत होता, त्याच मैदानावर ही स्पर्धा होणार आहे.

या निमित्ताने कोल्हापुरातील अश्‍वशौकिन, कोल्हापुरातले गाजलेले जॉकी, नामवंत घोडी, रेसकोर्स मैदानाचा इतिहास, छायाचित्रे, मुंबई, पुणे, बंगळूर येथील रेसकोर्स मैदानावर गाजलेली कोल्हापुरातील दिग्गज मंडळी याचे दर्शन घडवणारे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.

 

Web Title: Kolhapur News Jumping Show of Horse in March