कळंबा कारागृहात बनले प्रसादाचे साडेनऊ लाख लाडू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

बंदिजनांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जातात. प्रसादाचा लाडू तयार करण्याच्या कामातून बंदिजनांत समाधान व उत्साह पहावयास मिळत आहे. 
शहर शेळके, कारागृह अधीक्षक.

कोल्हापूर - कळंबा कारागृहाने गेल्या वर्षभरात तब्बल ९ लाख ३२ हजार अंबाबाई मंदिराच्या प्रसादाचे लाडू बनवले. त्यातून शासनास २७ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. हातातून एक चांगले काम घडत असल्याने बंदिजनातही उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. 

अंबाबाई मंदिरातील प्रसादाचे लाडू तयार करण्याचा ठेका कळंबा कारागृहाला १४ जुलै २०१६ ला मिळाला. स्वतंत्र कक्षेत आणि पावित्र्य जपत बंदिजनांकडून लाडू बनविण्याच्या कामास सुरवात झाली. दररोज सुमारे दोन ते 

तीन हजार लाडूंची मागणी होऊ लागली. कारागृहात ५० स्त्री-पुरुष बंदिजनांच्या माध्यमातून काम केले जाऊ लागले.  सुटीच्या काळात या लाडूंची मागणी पाच हजार तर नवरात्रौत्सवात २० हजारांपर्यंत वाढली. त्याकरिता स्वतंत्र नियोजन कारागृह  प्रशासनाकडून करण्यात आले. दोन दोन सत्रात बंदिजन  वाढवून भक्तांकडून आलेली मागणी पूर्ण करण्याचे आव्हान कारागृहाने सहज पेलले. गैरकृत्यामुळे कारागृहात अडकलेल्या बंदिजनांना एक चांगले काम हाती मिळाल्याने त्यांच्यात उत्साहाचे 
वातावरण तयार झाले. प्रसादाच्या लाडूचा ठेका मिळून १४ जुलैला एक वर्ष पूर्ण होते. आज अखेर कारागृहाने ९ लाख ३२ हजार ८२५ लाडूंची निर्मिती करून ते देवस्थान समितीस दिले. त्यातून शासनाला २७ लाख ५ हजार ७८ रुपयाचे शासनाला उत्पन्न मिळाले. त्यातून बंदिजनांना पाच लाख रुपयांची मजुरी मिळाल्याचे  कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितले.  

Web Title: kolhapur news kalamba jail Ladoo