‘कमवा व शिका’मध्ये मुलींचा वाढला सहभाग

राजेश मोरे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

कोल्हापूर - गुणवत्ता आहे, पण परिस्थिती नाही, म्हणून विद्यार्थ्यांनो शिक्षण थांबवू नका. शिवाजी विद्यापीठाची ‘कमवा व शिका’ योजना तुमच्या पाठीशी आहे. स्वावलंबनाबरोबर श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा कानमंत्र या योजनेतून दिला जातोय. सुरक्षिततेबरोबर ज्ञान मिळणाऱ्या योजनेत विद्यार्थिनींचा सहभाग वाढत आहे. शिवाजी विद्यापीठाने पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ योजना सुरू केली. विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या प्रेरणेतून १९६८ मध्ये याची सुरुवात झाली.

कोल्हापूर - गुणवत्ता आहे, पण परिस्थिती नाही, म्हणून विद्यार्थ्यांनो शिक्षण थांबवू नका. शिवाजी विद्यापीठाची ‘कमवा व शिका’ योजना तुमच्या पाठीशी आहे. स्वावलंबनाबरोबर श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा कानमंत्र या योजनेतून दिला जातोय. सुरक्षिततेबरोबर ज्ञान मिळणाऱ्या योजनेत विद्यार्थिनींचा सहभाग वाढत आहे. शिवाजी विद्यापीठाने पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ योजना सुरू केली. विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या प्रेरणेतून १९६८ मध्ये याची सुरुवात झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याची संधी यातून दिली जाते. ग्रामीण भागातून व जिल्ह्याबाहेरील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीअभावी पुढील शिक्षण घेता येत नाही. वसतिगृह, जेवणाखाण्याचे व शैक्षणिक शुल्क कसे भरायचे, हाताला काम मिळेल का? याची हमी, नवख्या ठिकाणी सुरक्षिततेचा काय भरवसा? असे अनेक प्रश्‍न पालकांसह विद्यार्थ्यांना भेडसावतात. 

अशा आर्थिकदृष्ट्या दुर्लब विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ ही योजना म्हणजे पर्वणीच ठरते. या योजनेतून शिक्षण घेतलेले डॉ. राजन गवस, डॉ. चंद्रकांत भोसले, प्रा. किसन कुराडे अशी अनेक दिग्गज मंडळी नावारुपाला आली. 

आर्थिकदृष्ट्या दुर्लब व गरजू पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होता येते. मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याचा विचार करून त्यांना दिवसातील ३ तास  कार्यालयीन काम दिले जाते.

झेरॉक्‍स काढणे, कॅशिअर, लिपिक कामात मदत करणे, संगणक हाताळणे, ग्रंथालयाचे आणि इंटरनेट विभाग सांभाळण्याचे काम विद्यार्थ्यांना दिले जाते. या श्रमाचा मोबदला म्हणून विभागातर्फे त्यांची वसतिगृह, खानावळ आणि शैक्षणिक शुल्क भरले जाते. विद्यापीठातच काम देऊन विद्यार्थिनींना सुरक्षितता दिली जाते. शिक्षणाचा खर्च घरच्यांवर टाकत नाही, स्वतःच्या पायावर उभे राहत आहोत, असा आत्मविश्‍वास योजनेतून विद्यार्थ्यांत निर्माण होतो. समन्वयक डॉ. एस. डी. शिंदे आणि डॉ. एम. एस. निंबाळकर या योजनेचे काम पाहतात. 

कमवा व शिका योजनेतील सवलती...
*वार्षिक निवासी शुल्क ४०५० रुपये
*खानावळ (मेस) शुल्क (मासिक) ः १००० ते १३०० रुपये
*परीक्षा शुल्क (विज्ञान शाखा) ११५० रुपये
*इतर शाखेसाठी ५६० रुपये  

‘‘स्थानिक गरजू विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होता येते. दिवसातील तीन तास काम दिले जाते. त्याबदल्यात त्यांना दिवसाला सरासरी २२ रुपये मानधन दिले जाते. ते त्यांच्या बॅंक खात्यावर महिन्याला वर्ग केले जाते,
-  डॉ. एस. डी. शिंदे, समन्वयक.

Web Title: kolhapur news kamava ani shika girl involve