केडीसीसीच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे - हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

कोल्हापूर - नोटबंदीच्या काळात जिल्हा बॅंकेत जमा झालेल्या जुन्या २७९.७७ कोटी रूपयांच्या नोटांपैकी २५४.५० कोटी रूपये काल मध्यरात्री विशेष कंटेनरमधून कडक सुरक्षा व्यवस्थेत रिझर्व्ह बॅंकेकडे पाठवण्यात आले. उर्वरित २५.२७ कोटी रूपये हे ८ नोव्हेंबरला बॅंकेतील शिल्लक होती, ही रक्कम रिझर्व्ह बॅंकेने स्वीकारलेली नाही, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कोल्हापूर - नोटबंदीच्या काळात जिल्हा बॅंकेत जमा झालेल्या जुन्या २७९.७७ कोटी रूपयांच्या नोटांपैकी २५४.५० कोटी रूपये काल मध्यरात्री विशेष कंटेनरमधून कडक सुरक्षा व्यवस्थेत रिझर्व्ह बॅंकेकडे पाठवण्यात आले. उर्वरित २५.२७ कोटी रूपये हे ८ नोव्हेंबरला बॅंकेतील शिल्लक होती, ही रक्कम रिझर्व्ह बॅंकेने स्वीकारलेली नाही, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला नोटाबंदी केली. त्यानंतर १० ते १४ नोव्हेंबरअखेर या जुन्या नोटा स्वीकारण्याचे अधिकार जिल्हा बॅंकांना दिले. या काळात बॅंकेकडे २५४.५० कोटींच्या नोटा जमा झाल्या. ८ नोव्हेंबरला बॅंकेकडे २५.२७ कोटींच्या जुन्या नोटा होत्या. एकूण २७९ कोटी ७० लाख रूपयांच्या नोटा गेल्या सात महिन्यापासून बॅंकेत पडून होत्या. या रक्कमेवर संबंधितांना बॅंकेकडून व्याज दिले होते. दिवसाला १५ लाख तर आतापर्यंत नऊ कोटी रूपयांचे व्याज बॅंकेला द्यावे लागले. ही व्याजाची रक्कमही रिझर्व्ह बॅंकेकडून परत मिळावी. जिल्हा बॅंका या राजकारणी लोकांच्या ताब्यात असतात त्यामुळे ८ नोव्हेंबर रोजी त्यांच्याकडून या नोटा बदलल्या असतील, अशी शंका व्यक्त झाली. त्यामुळे ह्या नोटा स्वीकारल्या नाहीत.’

ते म्हणाले,‘१० ते १४ नोव्हेंबरपर्यंत जमा झालेल्या नोटा रिझर्व्ह बॅंकेने स्वीकारल्या. त्याची पोचही बॅंकेला दिली. या सर्व रक्कमेची केवायसी पूर्ण झाली आहे. त्याचा परतावा मात्र मिळालेला नाही. विदर्भ, मराठवाड्यातील बॅंकांना हा परतावा मिळाला, कारण त्यांची रक्कम कमी होती. ८ नोव्हेंबरच्या नोटांचीही केवायसी पूर्ण आहे, त्यात कोणताही गैरप्रकार नाही. या नोटा स्वीकारल्या नाहीत तर पुन्हा आम्ही सर्वोच्च न्यायालयात त्यासाठी दाद मागू.’

या रक्कमेवर विमा नाही, त्यामुळे मध्यरात्री या नोटा पाठवण्यात आल्या. परिणामी ही बातमी येणार नाही, अशी दक्षता घेण्यात आली, असेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, प्रभारी व्यवस्थापक जी. एम. शिंदे आदी उपस्थित होते.

४ टक्के शिल्लक ठेवावी लागते
बॅंकेच्या एकूण व्यवहाराच्या चार टक्के रक्कम ही शिल्लक ठेवावी लागते. बॅंकेकडे १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर या काळात दररोज ६५ ते ८० कोटी रूपये शिल्लक ठेवले होते. या नोटा ज्यांनी भरल्या त्याची केवायसी तपासली आहे. आवश्‍यकता असल्यास रिझर्व्ह बॅंकेने पुन्हा याची तपासणी करून ही रक्कम स्वीकारावी, त्याचबरोबर संपूर्ण रक्कमेवरील व्याज मिळावे यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: kolhapur news kdcc old currency to reserve bank