पळालेली मीटरही येथे होतात रिव्हर्स

पळालेली मीटरही येथे होतात रिव्हर्स

कोल्हापूर - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मीटर रिडरना भ्रष्टपणाची कीड लागली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या महसुलाला गळती लागली, तर मीटर रिडरची खिशाचीच भरती, अशी स्थिती निर्माण झाली आहे. भ्रष्टपणाबरोबरच काही मुजोर मीटर रिडर या विभागात राहून नागरिकांची अक्षरश: पिळवणूक करत आहेत. कपिल पाटील यापैकीच एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. असे अनेक ‘कपिल’ या विभागाच्या माध्यमातून नागरिकांना लुटण्याचे काम करत आहेत. या मीटर रीडरांचा प्रताप इतका की,अनेक कमर्शियल पळालेली मीटर ही बघता बघता रिव्हस करण्याचे तंत्र या मीटर रीडरांनी अवलंबिले आहे.

शहरात पाणीपुरवठा विभागाकडे सुमारे सव्वा लाख नळकनेक्‍शन आहेत. गेल्या सात ते आठ वर्षांत शहरातील सर्व सरकारी नळ बंद केल्यामुळे घरगुती कनेक्‍शनची संख्या वाढली आहे. प्रत्येक नळ कनेक्‍शनधारकाला मीटर बसविण्याची सक्ती आहे. कोल्हापुरात मीटरद्वारे पाण्याच्या बिलाची आकारणी केली जाते. नागरिकही प्रामाणिकपणे मीटरप्रमाणे बिल भरतात; पण अलीकडच्या काळात काही भ्रष्ट मीटर रिडरची कीड या विभागाला लागली आहे. विनाकारण पाण्याचे बिल वाढविणे, मीटरमध्ये परस्पर बदल करणे, मीटर फॉल्टी दाखविणे, असे अनेक प्रकार घडवून आणून नागरिकांच्या हातात हजारो रुपयांचे बिल देण्याचा हा फंडा मीटर रिडरनी काढला आहे. अव्वाच्या सव्वा बिल पाहून नागरिक काही तरी तडजोड करा, दुरुस्ती करा, यासाठी मीटर रिडरांच्या मागेपुढे फिरत असतात. त्याचाच हा फटका आता नागरिकांना बसत आहे. 

पाण्याचे बिल कमी करून देतो, असे सांगून रोज शेकडो रुपये उकळणारे काही महाभाग मीटर रिडर या शहरात तयार झाले आहेत. काहींची तर शहरात एकप्रकारे अरेरावीच सुरू आहे. 

नागरिकांना पाण्याचे बिल जेवढे येणे अपेक्षित आहे, त्यापेक्षा अव्वाच्या सव्वा पाण्याची बिले नागरिकांना देण्यासाठी काही मीटर रिडरनी शहरात वेगळीच फिल्डींग लावली आहे. यासाठी काही विशिष्ट नळकनेक्‍शनधारकांना वेठीस धरले जात आहे. अनेक मध्यमवर्गीय नोकरदारांना याकडे गांभीर्याने पाहण्यासाठीच वेळ नाही. नेमकी हीच स्थिती ओळखून मीटर रिडर गैरफायदा घेत सुटले आहेत.

शहराच्या गावठाण भागात जुनेजाणते कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक यांचा दरारा असल्याने या परिसरात हे मीटर रिडर फारसा शिरकाव करत नाहीत; पण उपनगरात मात्र या मीटर रिडरनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बिले अव्वाच्या सव्वा पाठवायची आणि पुन्हा ती कमी करण्यासाठी तोडपाणी करायचे, हा धंदाच जणू काही मीटर रिडरनी मांडला आहे. याला चाप लावण्यासाठी मध्यंतरी तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पॉट बिलिंगची योजना आखली होती; पण ही योजनाच बंद पाडण्यासाठी मीटर रिडरांची एक वेगळी यंत्रणा काम करत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com