उत्पन्न न वाढल्यास ग्रामीण केएमटी बसेस बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

कोल्हापूर - केएमटीचा तोटा कमी करण्यासाठी तोट्यातील ग्रामीण बससेवा बंद करण्याचा निर्णय केएमटी प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.

कोल्हापूर - केएमटीचा तोटा कमी करण्यासाठी तोट्यातील ग्रामीण बससेवा बंद करण्याचा निर्णय केएमटी प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. वडकशिवाले, बाचणी, शिरोली दुमाला व पाचगाव मार्गावरील उत्पन्न महिन्यात वाढले नाही, तर या मार्गावरील बससेवा पहिल्या टप्प्यात बंद करणार आहेत, असे पत्रक केएमटी प्रशासनाने दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, केएमटीतर्फे शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विविध २८ मार्गांवर ११२ बसेस धावतात. दैनंदिन उत्पन्न  खर्चाचा विचार करता, सध्या केएमटीला रोज सुमारे अडीच लाखांचा तोटा सहन करावा लागतो. हा तोटा कमी करण्यासाठी कमी उत्पन्नाच्या ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्याचे ठरले आहे. सर्वेक्षणात सर्वांत अधिक तोट्यात किंवा कमी उत्पन्न असणाऱ्या मार्गावरील बसेस बंद करण्याचे ठरले.

पहिल्या टप्प्यात चार गावांमधील बसेस अधिक तोट्यात असल्याचे आढळून आले. त्यामध्ये वडकशिवाले, बाचणी, शिरोली दुमाला आणि पाचगाव या चार गावांचा समावेश आहे. त्यामुळे या मार्गावर बससेवा सुरू ठेवणे केएमटीला जिकिरीचे झाले आहे. प्रयत्न करूनही केएमटीच्या प्रवास संख्येत आणि उत्पन्नात वाढ न झाल्यास एक महिन्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता वरील मार्गावरील बसेस बंद करण्यात येतील.

ग्रामस्थांनीच हातभार लावावा
चार गावांतील सर्व नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी प्रवासासाठी केएमटी बसचा वापर करावा. त्यासाठी गावातील सरपंच व लोकप्रतिनिधींनी विविध माध्यमातून त्यांचे प्रबोधन करून महिन्याच्या कालावधीत केएमटीच्या उत्पन्नात भरीव वाढ करण्याचा प्रयत्न करावा. गावातून प्रवाशांच्या संख्येत वाढ करून केएमटीचा तोटा कमी करण्यास हातभार लावावा.

Web Title: Kolhapur News KMT Bus income issue