पाच जूनपासून अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

अभियांत्रिकी प्रवेश दृष्टिक्षेपात

 •  प्रवेश अर्ज व कागदपत्रांची छाननी    ५ ते १७ जून 
 •  कच्ची गुणवत्ता यादी    १९ जून 
 •  पक्की गुणवत्ता यादी    २२ जून
 •  पहिल्या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती    २२ जून
 •  विकल्प भरण्याची मुदत    २३ ते २६ जून
 •  प्रवेश मिळालेल्यांची पहिली यादी    २८ जून
 •  दुसरी विकल्प फेरी    ५ ते ८ जुलै
 •  प्रवेश मिळालेल्यांची दुसरी यादी    १० जुलै
 •  तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा    १६ जुलै
 •  विकल्प बदलण्याची मुदत    १६ ते १९ जुलै
 •  प्रवेश मिळालेल्यांची तिसरी यादी    २१ जुलै

गडहिंग्लज : तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सामाईक प्रवेशपूर्व परीक्षा सेलमार्फत अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावी निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थी असतानाच अभियांत्रिकी प्रवेशाची तयारी पूर्ण झाली आहे. पाच जूनपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून यंदाही प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार आहेत. १७ जूनअखेर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत आहे. २२ जूनला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयातील रिक्त राहणाऱ्या जागांसाठी जादा फेरी देखील होणार आहे. 

बारावी परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. सोशल मीडियातून निकालासाठी रोज एक नवीन तारीख सांगितली जात आहे. पुढील आठवड्यात हा निकाल अपेक्षित आहे; परंतु त्यापूर्वीच सामाईक प्रवेशपूर्व परीक्षा सेलतर्फे अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ५ जूनपासून विद्यार्थ्यांना www.dtemaharashtra.gov.in/fe २०१७  या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचे आहेत.

सीईटीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने शुल्क भरण्याची आवश्‍यकता नाही. इतरांना मात्र खुल्या गटाला ८०० तर मागासवर्गीयांना ६०० रुपये प्रवेश अर्जाची किंमत आहे. १७ जून अखेर विद्यार्थ्यांना आपापल्या गुणपत्रकांची छाननी अर्ज स्वीकृती केंद्रात जाऊन करावयाची आहे. प्रत्येक जिल्ह्यातील अर्ज स्वीकृती केंद्र असणाऱ्या महाविद्यालयांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. सुटीच्या दिवशीही ही केंद्रे सुरू राहणार आहेत. 

यंदाही प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार आहेत. १९ जूनला कच्ची गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीवर आक्षेप नोंदविण्यास २० व २१ जून अशी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. २२ जूनला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. सीईटीला यंदा मोठ्या संख्येने विद्यार्थी बसले आहेत. त्यामुळे या वर्षी अभियांत्रिकी प्रवेशाला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा संस्था चालकांची आहे. पहिल्या फेरीसाठी राज्यातील उपलब्ध जागांची माहिती २२ जूनला जाहीर होणार आहे. यासाठी २३ ते २६ जून अखेर अर्ज करण्याची मुदत आहे. २८ जूनला पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी लागेल. ५ ते ८ जुलै अखेर दुसरी विकल्प फेरी होईल. १० जुलैला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची दुसरी यादी लागणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी रिक्त असणाऱ्या जागांची माहिती १६ जुलैला प्रसिद्ध होईल. तिसऱ्या फेरीसाठी विकल्प फेरीत बदल करण्याची मुदत १९ जुलै आहे. २१ जुलैला तिसरी यादी जाहीर होणार आहे. १ ऑगस्टला शैक्षणिक कामकाजाला प्रारंभ होणार आहे. शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांसाठी ३ ऑगस्टला जादा फेरी होईल. 


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Kolhapur News Kolhapur Education Engineering