कोल्हापूर महापौरपदासाठी सावध हालचाली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

कोल्हापूर - येथील महापौर स्वाती यवलुजे यांच्या पदाची मुदत १५ मे रोजी संपणार आहे. महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. सत्तारूढ दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात सामना रंगणार आहे. 

कोल्हापूर - येथील महापौर स्वाती यवलुजे यांच्या पदाची मुदत १५ मे रोजी संपणार आहे. महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. सत्तारूढ दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात सामना रंगणार आहे. 

महापालिकेतील दोन्ही काँग्रेसची सत्ता खेचून आणायची, असा चंग भाजप-ताराराणी आघाडीने बांधला आहे, तर स्थायी समिती सभापती निवडीवेळी झालेल्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी दोन्ही काँग्रेसने पक्षातील नाराजी दूर करून चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे २५ मेपर्यंत कोणत्याही दिवशी जाहीर होणाऱ्या या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

इच्छुकांची तयारी सुरू
महापौरपदाचे आरक्षण अडीच वर्षे सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आहे. पदासाठी काँग्रेसकडून शोभा बोंद्रे, इंदुमती माने, उमा बनछोडे, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम यांची नावे चर्चेत आहेत. भाजप-ताराराणी आघाडीकडून तेजस्विनी इंगवले, स्मिता माने, उमा इंगळे, जयश्री जाधव, सविता भालकर, भाग्यश्री शेटके, रूपाराणी निकम या इच्छुक आहेत. त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

काँग्रेसच्या स्वाती यवलुजे महापौर आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या स्थायी समिती सभापती निवडीत भाजपने दोन्ही काँग्रेसला धक्का देत स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक जिंकली. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे, तर दोन्ही काँग्रेसने या वेळच्या चुका दुरुस्त करायला सुरवात केली आहे.

नाराज सदस्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काहीही करून सत्ता कायम ठेवायची, असा दृढ निश्‍चिय त्यांनी केला आहे. भाजप-ताराराणी आघाडीतही काही नाराज सदस्य आहेत. त्यांनाही गळाला लावले जाण्याची शक्‍यता पालिका वर्तुळात आहे.

Web Title: Kolhapur News Kolhapur Mayor Election