कोल्हापूरात लिंगायत समाजाचा यल्गार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

कोल्हापूर - लिंगायत धर्माला संविधानिक स्वतंत्र मान्यता मिळाल्याशिवाय हा लढा न संपविण्याचा निर्धार लिंगायत समाजाच्या महामोर्चात करण्यात आला. या महामोर्चाला पाठींबा देण्यासाठी लिंगायत धर्मातील धर्मगुरुसंह, विविध समाजाच्या, धर्माच्या लोकांनी या मोर्चाला पाठींबा दिला. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा रस्ता या मोर्चातील गर्दीने भरुन गेला होता.

कोल्हापूर - लिंगायत धर्माला संविधानिक स्वतंत्र मान्यता मिळाल्याशिवाय हा लढा न संपविण्याचा निर्धार लिंगायत समाजाच्या महामोर्चात करण्यात आला. या महामोर्चाला पाठींबा देण्यासाठी लिंगायत धर्मातील धर्मगुरुसंह, विविध समाजाच्या, धर्माच्या लोकांनी या मोर्चाला पाठींबा दिला. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा रस्ता या मोर्चातील गर्दीने भरुन गेला होता.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्पा खुपसे म्हणाले, मी सैनिक आहे. आज वयाने जरी 95 वर्षाचा असलो तरी समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार. जाेपर्यंत लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरुच राहणार आहे.

कोरणेश्‍वर महास्वामीजी म्हणाले, लिंगायत हा स्वतंत्र धर्मच आहे. या धर्माचे भारतात आठ कोटी लोक आहेत. आता संविधानिक मान्यतेसाठी हा लढा सुरु आहे. एकसंघपणे समाजबांधवांनी हा लढा दिला पाहीजे. या लढ्याला बौध्द, सिख, मुस्लिम, ख्रिश्‍चन आदीसह सर्वच धर्मबांधवांनी पाठींबा दिल्याने एक वेगळीच ताकद मिळत आहेत. चन्नबसवानंद स्वामीजी यांनीही यावेळी मत व्यक्त केले. 

राजकीय प्रवाहात सहभागी व्हा - सिमरनजीत सिम मान 
शिरोमणी अकाली दलाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष सिमरनजीत सिम मान या महामोर्चाला पाठींबा देण्यासाठी खास पंजाबहून आले होते. ते म्हणाले, काँग्रेस तसेच भाजप तुमच्या धर्माला स्वतंत्र मान्यता देण्यास टाळाटाळ करतील. त्यामुळे तुम्ही स्वतः या धर्मातील लोकांनी राजकीय प्रवाहात यावे, तुम्ही राजकीय प्रवाहात आल्याशिवाय तुम्हाला तुमचा हक्क मिळणार नाही. यासाठी शीख समाज तुमच्यासोबत आहे. लिंगायत आणि शीख हातात हात घालून एकत्र काम करतील. सैन्यदलात ज्याप्रमाणे मराठा रेजीमेंट आहे. शीख रेजीमेंट आहे.त्याप्रमाणे लिंगायत रेजीमेंटही असायला हवी, असे मला वाटते.

लिंगायत धर्माचा आणि विचाराचा प्रसार करणाऱ्या प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यासारख्यांना मारुन विचार संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचे मारेकरी सापडत नाहीत. आपली राजकीय ताकद वाढविल्याशिवाय आपले हक्क अधिकार आपल्याला मिळणार नाहीत. 
 

वाहतुकीचे नेटके नियोजन -
महामोर्चामुळे दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर रस्त्याकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. शहर वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ व त्यांच्या कर्मचारी चौकाचौक उभे होते. ते वाहतूक मार्गात झालेला बदल वाहन चालकांच्या निदर्शनास आणून देत त्यांना पर्यायी मार्गाने वाहने नेण्यास सांगत होते. त्यामुळे शहरात वाहतुक कोडींचा प्रश्‍न निर्माण झाला नाही. 

मुस्लिम समाजाची सामाजिक बांधिलकी... 
मुस्लिम समाजाने मोर्चास पाठिंबा देण्याबरोबर मोर्चातील सहभागी समस्त लिंगायत बांधवांसाठी पाणी व फळ वाटप केले. बसंत बहाररोड चौकात समाजातर्फे मोठा मंडप उभारण्यात आला होता. तेथे मुस्लिम बांधवांकडून लिंगायत बांधवाना पाणी, केळी, बोर वाटप करण्यात येत होते. तसेच पाण्याचे पाऊच आणि फळांच्या साली टाकण्यासाठी बकेटस्‌ही उपलब्ध करून देण्यात आले होते. याचे नियोजन ऑल इंडिया फोरम कोल्हापूर, मज्लिसेशूरा उमला ए शहर कोल्हापूर आणि समस्त मुस्लिम समाजातर्फे करण्यात आले होते. 

मराठा महासंघातर्फे बिस्कीटे पाणी वाटप 
मोर्चात सहभागी लिंगायत बांधव आणि बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांना अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे एक हजार बिस्कीट पुडे आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. इतकेच नव्हे तर बिस्कीट पुड्याचे कागद आणि पाण्याचे पाऊच कार्यकर्त्यांनी एकत्रित करून रस्त्यावर कचरा होणार नाही याची दक्षता घेतली. त्यांच्या या उपक्रमाचे सहभागी झालेल्या लिंगायत समाजाने केले. या उपक्रमात जिल्हाध्यक्ष वंसत मुळीक, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, चंद्रकांत चव्हाण, शरद साळुंखे, आप्पा मिसाळ, शूभम शिरहड्डी, गौरव पाटील, कुमार काटकर, नेहा मुळीक, अनिल पाटील, मारुती पोवार, शैलेजा भोसले, मंगल कुऱ्हाडे, सारिका काकडे, वंदना जाधव, विजयसिंह पाटील, किरण कणसे, अवधूत पाटील, सारंग मिसाळ, राहूल मिसाळ, महादेव पाटील, उज्वला जाधव, लहू शिंदे हे सहभागी झाले होते. 

Web Title: Kolhapur News Lingayat Samaj Morcha