शेतकरी सुटले पण बॅंक अडकली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ दिवाळीपूर्वी देण्याच्या गडबडीत जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांना फक्त प्रमाणपत्रे दिली व त्यांची रक्कम बॅंकेला खात्यावर जमा करण्यास सांगितले. बॅंकेने रक्कम भरली. त्यातून शेतकरी सुटले; मात्र बॅंकेला अजून एक रुपयाही या २७ शेतकऱ्यांच्या कर्जापोटी मिळालेला नाही. 

कोल्हापूर -  राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ दिवाळीपूर्वी देण्याच्या गडबडीत जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांना फक्त प्रमाणपत्रे दिली व त्यांची रक्कम बॅंकेला खात्यावर जमा करण्यास सांगितले. बॅंकेने रक्कम भरली. त्यातून शेतकरी सुटले; मात्र बॅंकेला अजून एक रुपयाही या २७ शेतकऱ्यांच्या कर्जापोटी मिळालेला नाही. 

राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली; पण त्यात अटी व निकषांचा समावेश केला. त्याचा परिणाम बॅंकांच्या कर्जवसुलीवर झाला. बॅंकांच्या मागणीवरून वसुलीची तारीख ३० जूनवरून जुलै २०१७ पर्यंत वाढवली. बॅंकांवर अविश्‍वास दाखवून कर्जमाफीचे निकष तपासण्याचे काम ज्यांचा सहकाराशी काही संबंध नाही, अशा आयटी विभागाकडे सोपवले. दिवाळीपूर्वी कर्जमाफी होणार म्हणून शेतकरी प्रतीक्षेत होते; पण शेतकऱ्यांची दिवाळी झालीच नाही. 
सरकारने घाईगडबडीने दिवाळीच्या दिवशी प्रत्येक तालुक्‍यातील दोन शेतकऱ्यांना जिल्ह्यात प्रमाणपत्रे देऊन ते कर्जमुक्त झाल्याचे व योजनेचा लाभ प्रत्यक्ष सुरू झाल्याचे जाहीर केले. 

या २७ शेतकऱ्यांची रक्कम बॅंकेला संबंधितांच्या खात्यावर भरण्यास सांगितली. बॅंकेने ११ लाख ८४ हजार रुपये भरले. त्यामुळे कर्जदार शेतकरी सुटले असले तरी बॅंकेला या रकमेपैकी एक रुपयाही मिळालेला नाही. बॅंकेने नियम बाजूला ठेवून या शेतकऱ्यांची खाती रिकामी केली. 

राज्य शासनाने जिल्हा बॅंकेच्या ५६ हजार २६५ कर्जदारांपैकी दोन दिवसांपूर्वी केवळ १०१३ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३ कोटी ८४ लाख रुपये जमा केले. ही रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात ग्रीन, येलो व रेड यादीतील शेतकरी किती याचाही तपशील नाही. एकूणच या कर्जमाफीचा गोंधळ संपता संपेना असा आहे. 

जिल्हा बॅंकेकडील कर्जमाफी
- दीड लाखांच्या आतील कर्जदार     ४९,९३७
    त्यांची रक्कम     १७३.३० कोटी 
- दीड लाखांपेक्षा जास्त रकमेचे कर्जदार     ३३२५
    त्यांची रक्कम     ४९.८७ कोटी 
- नियमित कर्जफेड करणारे शेतकरी     २ लाख ९ हजार 
    त्यांची रक्कम     ३६१.९५ कोटी 
- एकूण शेतकरी    २ लाख ६२ हजार ४६७
    त्यांची रक्कम     ५८५.१३ कोटी

Web Title: Kolhapur News Lone waiver issue