कोल्हापूर जिल्ह्यात कर्जमाफीतील ७१ हजार खाती ठरली अपात्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील ७१ हजार खाती अपात्र ठरली आहेत. २००९ पूर्वी किंवा २०१६ पूर्वी या खातेदारांच्या नावांवर कर्जाची नोंद असल्याने ते अपात्र ठरले आहेत.

कोल्हापूर - राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील ७१ हजार खाती अपात्र ठरली आहेत. २००९ पूर्वी किंवा २०१६ पूर्वी या खातेदारांच्या नावांवर कर्जाची नोंद असल्याने ते अपात्र ठरले आहेत.

दरम्यान, उर्वरित १ लाख २२ हजार ८१ खातेदारांची माहिती ऑनलाईन पद्धतीने मुंबईच्या आयटी विभागाला ‘अपलोड’ केली आहे. तफावत आढळलेल्या खात्यांची छाननी पूर्ण झाल्याने आता प्रतीक्षा ‘ग्रीन लिस्ट’चीच राहिली आहे. 

या योजनेत जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे, तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १५ ते २५ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. आतापर्यंत चार ‘ग्रीन लिस्ट’ प्रसिद्ध झाल्या, त्यातून ९० हजार शेतकऱ्यांची १७५ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे; पण गेल्या महिन्याभरापासून हे काम ठप्पच होते.

यापूर्वी ऑनलाईन भरलेल्या काही अर्जात त्रुटी तर काही अर्जातील माहितीत तफावत होती. पहिल्यांदा ८७ हजार, तर नंतर ३८ हजार खात्यांची यादी दुरुस्तीसाठी आली होती. 
गेले महिनाभर या खात्यांतील दुरुस्ती करण्याबरोबर नव्या खातेदारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू होते.

पहिल्यांदा माहिती पाठवलेल्या १ लाख २४ हजार ४८४ खात्यांची दुरुस्ती करताना त्यात ७० हजार ६३९ नवी खाती सापडली. अशा १ लाख ९५ हजार खात्यांची छाननी पूर्ण झाली असून, यातील ७१ हजार १७१ खाती अपात्र, तर १ लाख २२ हजार खाती पात्र ठरली आहेत. १९१८ खाती प्रलंबित आहेत, तर यापैकी १५०० खात्यांची माहिती अपलोड करण्याचे ‘पेंडिंग’ आहे. ही सर्व माहिती पाठवण्यात आली आहे. 

Web Title: Kolhapur News Lone waiver issue