esakal | महात्मा फुले समग्र वाङ्‌मयात दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश 
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा फुले समग्र वाङ्‌मयात दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश 

महात्मा फुले समग्र वाङ्‌मयात दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले यांचे गेली अनेक वर्षे उपलब्ध होत नसलेले महात्मा फुले समग्र वाङ्‌मय नव्या रूपात प्रकाशित होत आहे. या सुधारित आवृत्तीत सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण व दुर्लक्षित राहिलेल्या 200 पानांच्या साहित्याचा समावेश आहे. यामध्ये महात्मा फुलेंची सामाजिक पत्रकारिता, त्यांनी गर्व्हनर म्हणून केलेले काम, सयाजीराव गायकवाड यांच्याशी केलेला पत्रव्यवहार, यशवंतराव फुले लिखित आद्य फुले चरित्र, सत्यशोधक चळवळीतील ऐतिहासिक दस्तऐवज अशा अनेक बाबींचा समावेश आहे. येत्या 11 एप्रिलला सुधारित आवृत्तीचे प्रकाशन होत आहे. 

प्रा. हरी नरके यांनी याचे संपादन केले असून, पहिल्या आवृत्तीपासून गेली 30 वर्षे ते या ग्रंथाशी संबंधित आहेत. 2006 पासून समग्र वाङ्‌मयाचे प्रकाशन झाले नसल्याने वाचकांना ते उपलब्ध होत नव्हते. नरके यांच्या प्रयत्नामुळे महत्त्वपूर्ण, दुर्लक्षित पैलू व ऐतिहासिक दस्तऐवजांचा या सुधारित आवृत्तीत समावेश झाला आहे. 1969 मध्ये महात्मा फुले यांच्या समग्र साहित्याचे प्रथम प्रकाशन झाले. धनंजय कीर, स. गं. मालशे यांनी याचे संपादन केले होते. 1991 मध्ये फुले स्मृती शताब्दी वर्षानिमित्त डॉ. य. दि. फडके संपादित आवृत्ती काढण्यात आली. 2006 मध्ये निघालेली आवृत्तीही हातोहात खपली. आजअखेर अडीच लाखांहून अधिक प्रती खपल्याचे प्रकाशन समितीकडून सांगण्यात येते. एप्रिलअखेर ते मुंबई, कोल्हापूर, पुणे, नागपूरसह सर्व शासकीय ग्रंथ भांडारांत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 

महात्मा फुले समग्र वाङ्‌मयाचा अनुवाद इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमीळ, बंगाली, उर्दू, गुजराती आदी 13 भाषांमध्ये प्रकाशित झाला आहे. आणखी 9 भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. 
- प्रा. हरी नरके, सदस्य सचिव, महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समिती. 

loading image
go to top