जोतिबा रोडवरील अपंग आजीस दिला माऊलीने आधार 

निवास मोटे 
शनिवार, 27 जानेवारी 2018

आजीला अनेकांनी आधार देण्यासाठी प्रयत्न केले. पण आजीने दाद न दिल्याने त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर कोल्हापुरातील माऊलीने केअर सेंटरने केलेल्या प्रयत्नाला यश आले. तिला सशक्त बनविण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. तिला आयुष्यभर सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

जोतिबा डोंगर - रस्ता चुकून व विस्मरणामुळे स्वतःचे नावही न सांगू शकणारी अपंग आजी जोतिबा रोडवरील कुशीरे येथे विसावली. गेले तीन महिन्याहून अधिक काळ राहणाऱ्या या आजीला आसपासच्या रहिवाशांनी धीर दिला. येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांनीही तिला मायेचा हात दिला. या आजी संदर्भात ई सकाळमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर या आजीला अनेकांनी आधार देण्यासाठी प्रयत्न केले. पण आजीने दाद न दिल्याने त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर कोल्हापुरातील माऊलीने केअर सेंटरने केलेल्या प्रयत्नाला यश आले. तिला सशक्त बनविण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. तिला आयुष्यभर सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

26 जानेवारीस या या आजीला घेऊन जाण्यासाठी माऊली केअर सेंटरचे कार्यकर्ते येथे आले होते. यावेळी परिसरातील महिला व ग्रामस्थांनी तिला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. तिला नेताना ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तीन महिन्यांपूर्वी कुशिरे परिसरात दोन्ही पायाने अपंग व कन्नड बोलणारी आजी कुशीरे येथे आली होती. सुरवातील ती वेडी असल्याचा समज येथील ग्रामस्थांचा झाला. पण तिने रस्त्याच्या कडेला आसरा घेत तेथील जमीन शेणाने सारवून जागा स्वच्छ केली. दगडांची चुल मांडून ती स्वयंपाक करू लागली. तेव्हा तिला अनेकांनी आधार दिला. पण मराठी येत नसल्याने तिची फारशी ओळख झाली नाही. पण हळूहळू हा परिसर आजीच्या अंगवळणी पडू लागला. या परिसरात राहणाऱ्या पाटील परिवाराने तिला अंथरुण पीठ, तांदूळ आणि साखर व इतर साहित्य दिले. पोहाळे तर्फे आळते ता. पन्हाळा येथील सरदार ऊनाळे यांनी तिला दररोज सकाळी गरम भाकरी भाजी देऊन सहकार्य केले. या परिसरात राहून तिने महिलांना लळा लावला होता. 

या परिसरात राहणाऱ्या काहींनी कन्नड बोलणारे नागरि आणून या आजीची ओळख पटवून देण्यासाठी प्रयत्नही केला. पण यात यश आले नाही. शुक्रवारी (ता. 26) दुपारी माऊली केअर सेंटर चे संस्थापकअध्यक्ष दिपक कदम व व्यवस्थापक राहूल कदम या आजीला नेण्यासाठी ऍम्बुलन्स घेऊन आले. या परिसराला लळा लावल्याने ती जाण्यासाठी तयार नव्हती. ती कन्नड भाषेत विनवण्या करीत होती, पण पाठविण्याशिवाय लोकांना पर्याय नव्हता. कारण या आजीचे हाल व अपंगत्व पाहावत नव्हते. अखेर या आजीला उचलून ऍम्बुलन्समधून नेले. त्यावेळी या आजीने ग्रामस्थांना रडत रडत दोन्ही हात जोडून निरोप दिला. 

संबंधित बातमी

Web Title: Kolhapur news Maluli center will take care of unknown grandmothers