मुंबईच्या मराठा मोर्चामध्ये कोल्हापूरची ताकद दाखविणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

कोल्हापूर - मुंबईच्या मराठा क्रांती मोर्चातही कोल्हापूरची ताकद दाखविण्याचा निर्धार आज सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. जिल्ह्यातून सुमारे 50 हजार समाजबांधव मोर्चात सहभागी होतील, यादृष्टीने नियोजनास सुरवात झाली आहे. मावळा आणि रणरागिणी या नियोजनाचे नेतृत्व करतील. 

कोल्हापूर - मुंबईच्या मराठा क्रांती मोर्चातही कोल्हापूरची ताकद दाखविण्याचा निर्धार आज सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. जिल्ह्यातून सुमारे 50 हजार समाजबांधव मोर्चात सहभागी होतील, यादृष्टीने नियोजनास सुरवात झाली आहे. मावळा आणि रणरागिणी या नियोजनाचे नेतृत्व करतील. 

मुंबईत नऊ ऑगस्टला मोर्चा होत आहे. कोल्हापुरात 15 ऑक्‍टोबरचा मोर्चा ऐतिहासिक ठरला होता. त्या वेळी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून स्वयंस्फूर्तीने लोक सहभागी झाले. मुंबईचा मोर्चा महत्त्वाचाच आहे. राज्यात 58 मोर्चे झाले आहेत. मुंबईतील मोर्चाला महत्त्व आहे. कोल्हापूरच्या लोकांकडून मुंबईच्या संयोजकांना मोठ्या अपेक्षा आहेत. "एक मराठा-लाख मराठा' अशी घोषणा देत येत्या 15 दिवसांत पुन्हा एकदा ग्रामीण भागात प्रबोधन केले जाईल. मुंबईसाठी कार्यकर्ते स्वखर्चाने जाणार आहेत. 

ऍड. बाबा इंदूलकर म्हणाले, ""मराठ्यांनी आता तलवार म्यान करून चालणार नाही. ती आता बाहेर काढण्याची वेळ आली आहे. आपल्याच ढिलाईमुळे मराठ्यांवर अन्याय होत आहे. शिवाजी विद्यापीठात खुल्या वर्गातील भरती बंद आहे. जातीच्या आधारावर बढती दिली गेली. त्या विरोधात कोणीच आवाज उठवत नाही. जी गोष्ट विद्यापीठात झाली, तीच महापालिकेत. येथेही राज्य लोकसेवा आयोगाने दिलेले निर्देश डावलून भरती झाली. प्रत्येकवेळी मराठा बांधवांवर अन्याय होतो आणि आपण तो पाहत बसतो, हे योग्य नाही. मराठा मोर्चे काढायचे कशासाठी? रोस्टर 83 टक्‍क्‍यांवर गेले आहे. मराठा समाजातील तरुणांनी करायचे तरी काय? जेथे अन्याय होतो तेथे प्रथमच उभे राहू.'' 

दिलीप देसाई म्हणाले, ""मराठ्यांच्या यापुढील लढाईसाठी तरुणांनी जागे व्हावे. आपला पुढारी कोण हे आता विसरून जाऊ. तरुणांनी नेतृत्व हाती घ्यावे. मुंबईतील मोर्चात तरुणांची ताकद महत्त्वाची आहे. त्यामुळे कोल्हापुरातून जे लोक जाणार आहेत. त्यांचे नियोजन मावळे आणि रणरागिणी करतील.'' 

दिलीप पाटील म्हणाले, ""मराठा क्रांती मोर्चावेळी आरक्षणासह कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली होती. ऍड. उज्ज्वल निकम यांनी येत्या दोन महिन्यांत आरोपींना फाशी होईल, असे म्हटले आहे. मूळ मागण्यांबरोबर शैक्षणिक क्षेत्रात आव्हाने उभी आहेत, त्याचाही विचार व्हावा. अण्णासाहेब पाटील महामंडळाला पाचशे कोटी द्यावेत, "सारथी'चे केंद्र कोल्हापुरात व्हावे अशा मागण्या आहेत. आपल्याला संघर्षाशिवाय काही मिळालेले नाही. भविष्यातही संघर्ष करावा लागेल.'' 

वैशाली महाडिक यांनी मुंबईच्या मोर्चात महिलांचा सहभाग महत्त्वाचा असून, स्वखर्चाने सहभागी होऊ, अशी ग्वाही दिली. लाला गायकवाड यांनी राज्य शासनाशी संघर्ष केल्याशिवाय पदरी काही पडणार नाही, असे सांगितले. जयेश कदम यांनी नियोजनाचे नेतृत्व मावळे आणि रणरागिणीत करतील, असे सांगितले. फत्तेसिंह सावंत यांनी मोर्चासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्‍वासन दिले. सचिन तोडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोर्चे काढून नव्हे, जशास तसे उत्तर देऊन राज्यकारभार केला. आपल्या मागण्या मान्य व्हायच्या असतील तर उद्रेकाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. या वेळी उमेश सूर्यवंशी, राजू सावंत, ऍड. चारुलता चव्हाण, शिरीष भोसले, हर्शल सुर्वे, साक्षी पन्हाळकर, स्वप्नील पार्टे, संदीप पाटील आदी उपस्थित होते. 

मोफत रेल्वे प्रवासासाठी प्रयत्न 
राज्यभरातून मोर्चाला येणाऱ्या मराठ्यांची संख्या पाहता रेल्वे प्रवास मोफत हवा, यासाठी आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे प्रयत्न सुरू आहेत. राहण्याच्या व्यवस्थेसंबंधी आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे सचिन तोडकर यांनी सांगितले. खासदार संभाजीराजे यांचे सचिव अमर पाटील यांनी रेल्वे प्रवासासाठी संभाजीराजेंकडून प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. 

शिवाजी तरुण मंडळ वॉर रूम 
शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळातून कोल्हापुरातून मुंबईला मोर्चाला जाणाऱ्यांचे नियोजन होणार आहे. उद्यापासून कामास सुरवात होत आहे. दहा हजार मावळे आणि रणरागिणींच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रबोधन केले जाईल. ऑक्‍टोबरच्या मोर्चावेळी शिवाजी तरुण मंडळच मुख्य केंद्र होते.

Web Title: kolhapur news maratha morcha