कोल्हापूर महापालिका महापौरपदासाठी दोन्ही काँग्रेसकडून मुलाखती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

महापौरपदासाठी काँग्रेसकडून स्वाती यवलुजे, दीपा मगदूम, उमा बनछोडे, निलोफर आजरेकर या चौघीजण इच्छुक आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून सुनील पाटील, वहिदा सौदागर इच्छुक आहेत. 

कोल्हापूर - महापौर हसीना फरास व उपमहापौर अर्जुन माने यांनी राजीनामा दिल्यामुळे नव्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी 22 डिसेंबरला निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आज काँग्रेसकडून महापौरपदासाठी, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमहापौरपदाचा उमेदवार निश्‍चित करण्यासाठी मुलाखती झाल्या. महापौरपदासाठी काँग्रेसकडून स्वाती यवलुजे, दीपा मगदूम, उमा बनछोडे, निलोफर आजरेकर या चौघीजण इच्छुक आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून सुनील पाटील, वहिदा सौदागर इच्छुक आहेत. 

दोन्ही कॉंग्रेसमध्ये ठरल्याप्रमाणे एक वर्षे कॉंग्रेसकडे व दुसरे वर्षे राष्ट्रवादीकडे महापौरपद आहे. यापूर्वी कॉंग्रेसच्या अश्‍विनी रामाणे, तर राष्ट्रवादीकडून हसीना फरास यांची महापौरपदी वर्णी लागली होती. पुन्हा हे पद कॉंग्रेसच्या वाट्याला आले आहे. कॉंग्रेसकडून स्वाती यवलुजे, दीपा मगदूम, उमा बनछोडे आणि निलोफर आजरेकर यांच्या मुलाखती आज झाल्या. कॉंग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रदेश सचिव तौफिक मुल्लाणी आदी उपस्थित होते. 

या चौघांच्या मुलाखतीनंतर आमदार पाटील यांनी भाषण केले. महापौरपद हे महत्त्वाचे पद आहे. या पदाचा वापर लोकांच्या सोयीसाठी करायचा आहे. त्यामुळे जबाबदारीने हे पद सांभाळावे लागणार आहे. कॉंग्रेसकडून या पदासाठी चौघे इच्छुक आहेत. या चौघांच्याही मुलाखती घेतल्या. 

राष्ट्रवादीकडे उपमहापौरपद आहे. या पदासाठी सुनील पाटील, वहिदा सौदागर इच्छुक आहेत. उपमहापौरपद कोणाला द्यावे, याबाबत आमदार हसन मुश्रीफ, आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, प्रा. जयंत पाटील यांनी सर्व नगरसेवकांचे मत ऐकून घेतले. 

दोन्ही काँग्रेसचे सदस्य जाणार सहलीवर 
दोन्ही काँग्रेसचे सदस्य उद्यापासून सहलीवर जाणार आहेत. उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारांचे नाव निश्‍चित झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करून दोन्ही काँग्रेसचे सदस्य सहलीवर जाणार आहेत. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडी दिवशीच ते परत येतील. 

Web Title: Kolhapur News Mayor election